प्रतिकूल राजकीय परिस्थितीतून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

‘‘तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला काय मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला भारतात आल्यावर कळाला. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात लढताना अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर आधारित काम करणारे महात्मा गांधी आम्हालाही हवे आहेत.’’ येमेनमधून शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ‘एम.ए’ इंग्रजी शिक्षणासाठी आलेला सालेम सांगत होता.

तो पुढे म्हणाला, ‘‘आजही आमच्या देशात वयाच्या १२ व्या वर्षी मुलींचे विवाह होतात. जगणे म्हणजे मृत्यूशी रोजची लढाई, असा भवताल. त्यामुळे ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या गांधी तत्त्वज्ञानाची आम्हाला गरज आहे.’’ येमेन, सीरियासारख्या यादवी युद्धजन्य स्थितीत जगणाऱ्या विदेशी मुलांना भारताचे कौतुक वाटते, ते गांधी तत्त्वज्ञानाचे. गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या देशात वर्षभरातून एकच दिवस सर्व स्तरावर गांधीप्रेम उफाळून येते. मात्र जगभरात गांधी तत्त्वज्ञानाची ओळख होणारी तरुणाई त्यांच्या विचारांनी आकृष्ट होताना दिसत आहे. सीरियामध्ये दोन वर्षे यादवी युद्ध पाहून त्यातून पिचलेली नूर कस्सार सांगत होती, ‘‘तिथे रोज माणसे मारली जातात. शस्त्र आणि हिंसाचाराशिवाय जगणे नसते, असे आमच्या देशात वातावरण आहे. तसे आम्हाला गांधी पुरेसे माहीत नाहीत; पण अहिंसेच्या तत्त्वज्ञानातून स्वातंत्र्य मिळू शकते हे भारतात आल्यावर कळाले.’’ नूर सध्या औरंगाबादच्या आरेफ कॉलनीमध्ये राहते. एम.ए. (इंग्रजी) विषयाचे शिक्षण घेते. केवळ प्रतिकूल राजकीय परिस्थितीमुळे मातृभूमी सोडून आलेली अनेक मुले बोलत होती. सालेम शाजरी सांगत होता, ‘‘तुमचा देश बहुसांस्कृतिक आहे आणि तरीही येथे शांतता आहे. आमच्या देशात आता अमानवीय कृत्ये घडत आहेत. त्या अंधारी गुहेतून बाहेर पडता येईल की नाही माहीत नाही, पण विविध विचारसरणींना शांततेच्या मंत्रांनी बांधणारे गांधी आम्हालाही हवे आहेत. त्यांचे तत्त्वज्ञान आजही अनुकरण करण्यासारखे आहे.’’

फरास मुस्लामी सांगत होता, ‘‘सौदी अरेबियाला १९६७ ला स्वातंत्र्य मिळाले. म्हणजे भारतानंतर २० वर्षांनी; पण आमच्या देशात उत्तर आणि दक्षिण यात बाहेरून आलेला आणि मूळ निवासी असा संघर्ष आहे. आमच्या देशात न्याय मिळतच नाही. येथे तो कसा मिळावा याची शिकवण गांधींची असेल तर ते तत्त्वज्ञान आम्हालाही हवे आहे. अर्थात ते कसे आणि कोण वापरणार हे प्रश्न असतील.’’

सीरियामधील यादवीमध्ये महात्मा गांधी फारसे कोणाला माहीत नाहीत. त्यांना हा नेता कळाला तर आमचाही देश अहिंसेच्या मार्गाने जाईल. गोळीला उत्तर गोळीने देता येत नाही, हे कळायला वेळ लागतो; पण गांधींचे तत्त्वज्ञान चांगले बदल करूशकतात.

      – नूर कस्सार, विद्यार्थिनी