22 February 2019

News Flash

कर्तव्यदक्ष केंद्रेकरांची बदली रोखण्यामागे लोणीकरांचा हात

लोणीकरांना याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे हसून टाळले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

कर्तव्यदक्ष अशी ओळख असणाऱ्या सुनील केंद्रेकर यांची औरंगाबाद विभागीय आयुक्तपदी झालेली बदली रद्द करण्यामागे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचा हात असल्याची चर्चा मराठवाडय़ात दिवसभर होती. लोणीकरांना याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे हसून टाळले. शिवसेनाही डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याच बाजूने असल्याचे दिसून आले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी या अनुषंगाने अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

बीड जिल्ह्य़ात दुष्काळाच्या काळात जिल्हाधिकारी म्हणून सुनील केंद्रेकर यांनी केलेले काम आजही सर्वसामान्यांच्या लक्षात राहिलेले आहे. औरंगाबाद येथे सिडकोचे प्रशासक म्हणून काम करतानाही एकही काम अवैधरीत्या होऊ नये, असा त्यांचा कटाक्ष होता. औरंगाबाद महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कचऱ्याच्या प्रश्नावर केलेले काम आणि पथदिव्यांमधील निविदा घोळात त्यांनी दिलेल्या अहवालामुळे बरेच दिवस कंत्राटदारास उखळ पांढरे करून घेता आले नव्हते. वेगवेगळ्या विभागांत उत्तम काम करत असणाऱ्या केंद्रेकरांची शासनाने कृषी आयुक्त म्हणून बदली केली. नंतर त्यांच्याकडे युवा आणि  क्रीडा विभागाचा पदभार देण्यात आला. चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी थांबण्याऐवजी राज्य सरकार त्यांच्या वारंवार बदल्या करत आहे, असा संदेश राज्य सरकारच्या कारभारामधून मिळत राहिला. केंद्रेकर यांना या अनुषंगाने विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘मला बदलीचे आदेश मिळाले होते. मी रुजू होण्यासाठी येणार होतो. मात्र, नंतर तुम्ही थांबा, असा संदेश मला मिळाला. त्यामुळे मी रुजू झालो नाही,’ एवढेच त्यांनी सांगितले.

त्यांची झालेली बदली रद्द करण्यासाठी भाजपचे पुढारी सरसावले. त्यात प्रामुख्याने लोणीकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी ‘केंद्रेकर विभागीय आयुक्तपदी नको,’ अशी भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातर्फे समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासह काही महत्त्वाची कामे सुरू आहेत. ती कामे दोन-तीन महिन्यांत होतील. त्यामुळे कामे अंतिम टप्प्यात असताना विभागीय आयुक्तांची बदली करण्याऐवजी मे महिन्याच्या काळात ज्या नियमित बदल्या होतात, त्या वेळी बदली व्हावी, असे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातून सुचवण्यात आले. त्यामुळे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली काही काळ थांबवली. त्यातून केंद्रेकर यांची बदली थांबली. कसलेही राजकीय कारण बदली थांबवण्यामागे नाही.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

First Published on February 6, 2018 2:55 am

Web Title: sunil kendrekar transfer issue babanrao lonikar devendra fadnavis