स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा, परंतु मराठवाडा राज्यास विरोध, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे स्पष्ट केले. मराठवाडय़ातील जनतेचाच स्वतंत्र मराठवाडय़ास विरोध असल्याचे ते म्हणाले.
२६ जानेवारी ते १ मे दरम्यान निघालेली कन्याकुमारी ते महू भीमसंदेश यात्रा जालना शहरात आली. त्या निमित्त जाहीर सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही देशातील जातीयता संपुष्टात आली नाही. त्यासाठी सरकारने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले पाहिजे. एकास सरकारी नोकरी दिली पाहिजे. महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आणखी सात एकर जागा वाढवून दिली पाहिजे. राज्यघटनेत बदल करण्याचा विषय पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काही मंडळी अकारण खोटा प्रचार करीत आहेत. काँग्रेस किंवा अन्य पक्ष देशात विरोधी पक्षाची भूमिका आणि जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीत. कन्याकुमारी येथे असलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाच्या धर्तीवर तेथील समुद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहिले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यासाठी तीन हजार कोटींची विशेष तरतूद केली पाहिजे, असेही आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभेत बोलताना आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य व्हावे, ही आपली इच्छा असून एकीकृत पक्षात प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारण्यास आपण तयार आहोत. रिपब्लिकन ऐक्य करून २५ आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. देशात समता प्रस्थापित व्हावी आणि सर्वाना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा या उद्देशासाठी भीम संदेश यात्रा काढण्यात आली आहे. गायरान जमिनीच्या संदर्भातील १४ एप्रिल १९९० च्या शासन आदेशास मुदतवाढ द्यावी, तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष गणेश रत्नपारखे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सुधाकर रत्नपारखे, बबन रत्नपारखे, दिगंबर गायकवाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.