अतिवृष्टी झाल्यामुळे कृत्रिम पावसासाठी घिरटय़ा घालणाऱ्या विमानाचे उड्डाण पुढील आदेश येईपर्यंत करू नये, असे तोंडी आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवडय़ापर्यंत कृत्रिम पावसासाठी राज्यातील विविध भागात विमानाचे उड्डाण सुरू होते. या बाबतचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये  शनिवारी (२ नोव्हेंबर) प्रकाशित झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली होती. त्यानंतर उड्डाणे थांबविण्यात आली.

ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीपेक्षा मराठवाडय़ात ३३७.८५ टक्के पाऊस झाल्यानंतरही विमानांची उड्डाणे काही थांबली नाही. ऑक्टोबर महिन्यात १८ वेळा विमानानी उड्डाणे केली. त्याद्वारे ८०८ फ्लेअर्स ढगात सोडले होते.

राज्यभरात पावसाने अक्षरश: थैमान घातलेले असताना कृत्रिम पावसासाठी घिरटय़ा काढण्याची प्रक्रिया सुरू होती. एका बाजूला शेतकरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे टाहो फोडून सांगत होते तेव्हा सुरू  असणारी कृत्रिम पावसाची प्रक्रिया विरोधाभास दर्शविणारी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तूर्त विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले आहे. राज्य सरकारने या प्रयोगासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. हा प्रयोग सुरू झाल्यापासून त्याचा उपयोग किती झाला, यावर अनेक मतमतांतरे आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत उड्डाणे थांबविण्याबाबतचा लेखी आदेश येईल, असे सूत्रांनी सांगितले.