छत्रपती संभाजीनगर – प्रकाशक, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची मालमत्ता दुसऱ्याच्या नावे फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषी अधिकाऱ्यांविरोधात अभिप्राय देण्यासाठी दोन लाखांची लाच मागून एक लाख रुपये स्वीकारणारा सरकारी अभियोक्ता नंदकिशोर सीताराम चितलांगे (वय ५७, रा. बसैय्येनगर) याला चार वर्षांची सक्तमजुरी व विविध कलमांखाली २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आर. उबाळे यांनी गुरुवारी सुनावली. विशेष म्हणजे आरोपी नंदकिशोर चितलांगे याला सेवानिवृत्तीसाठी केवळ दीड महिना असताना त्याने लाच स्वीकारली होती.
या प्रकरणात उस्मानपुरा येथील किरण प्रभाकर देशमुख फिर्याद दिली होती. त्यानुसार, देशमुख यांची चितेगाव शिवारात चार एकर २० गुंठे जमीन आहे. तर सर्वे नं. ४ मधील गट नं. ६१ मध्ये साहित्यिक, प्रकाशक बाबा भांड यांच्या पत्नी व मुलाच्या नावे सहा हेक्टर १२ आर. एवढी शेत जमीन आहे. या शेत जमिनीपैकी पाच एकर जमीन ही पैठणचे तत्कालीन तहसीलदार राजीव शिंदे आणि तत्कालीन तलाठी तुकाराम सानप यांनी खोट्या कागदपत्राधारे सय्यद हबीब सय्यद इमाम याच्या नावे केली. याविरोधात उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल दाव्याचा निकाल देशमुख व भांड यांच्या बाजूने लागला. त्यानंतर भांड यांनी ३१ मे २०१४ रोजी पैठण पोलीस ठाण्यात तत्कालीन तहसीलदार राजीव शिंदे, तलाठी सानप व इतरांविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात चितलांगे याने अभिप्राय देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्या संदर्भाने देशमुख व भांड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर चितलांगेसोबत तडजोड करून अंतिमतः एक लाख देण्याचे ठरले. १४ ऑगस्ट २०१४ रोजी सापळा रचून आरोपी नंदकिशोर चितलांगे याला एक लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन निरीक्षक सचिन गवळी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मुख्य जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे आणि सहाय्यक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी चार साक्षीदार तपासले. माहिती पुरवण्याचे काम हवालदार सुनील बनकर यांनी पाहिले.