छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या बीड दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रमात त्यांच्या पक्षाचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांनी काही केलेल्या सूचनांचा जाहीरपणे उल्लेख केला. पवार यांची ही विधाने मुंडेंना बळ देऊन त्यांचे पक्षातील महत्त्व अधोरेखित करणारी मानली जात असली तरी बीड जिल्ह्याच्या शेजारीच असलेल्या लातूरमधील साखर कारखान्याच्या मांजरा परिवाराने शंभर टक्के हार्वेस्टरद्वारे ऊस काढून यांत्रिकीकरणाची कास धरल्याची उदाहरणे देणारी काही विधाने मात्र मुंडे यांच्यासाठी कानपिचक्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित करणारे ठरली.
बीड येथे ऊसतोड कामगारांसाठी आयोजित मेळावा व आरोग्य तपासणी शिबिरात बोलताना पालकमंत्री अजित पवार यांनी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख सांगणे हे भूषणावह नसल्याचेच अप्रत्यक्षपणे सूचित केले. आता बॅटरीवर चालणारे कोयते तयार झाल्याचे सांगून अजित पवार यांनी सध्याची ऊसतोड कामगारांची पिढी शेवटची ठरावी आणि त्यांची पुढची पिढी शिक्षणात उतरून जीवनस्तर उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बीड जिल्ह्याची मधल्याकाळात बदनामी झाली. परंतु, आता चुका सुधाराव्या लागतील. जर कोणी काही ऐकले नाही तर त्याला थेट मकोका लावू, असा थेट इशारा देत शिस्त आपल्यासह सर्वांनी पाळली पाहिजे, अशा शब्दांमध्ये पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. नवीन यांत्रिकीकरणाची साथ धरणे ही काळाची गरज असल्याचे सांगून पालकमंत्री अजित पवार यांनी अलीकडच्या भारत-पाकिस्तानात झालेल्या मिसाईल युद्धात ड्रोनसारख्या यंत्रणेचा वापर झाल्याची उदाहरणेही सांगितली. बीडमध्येही ऊसतोडणीसाठी ऊसतोड कामगारांना हार्वेस्टर देता येईल का, याचा विचार केला जाईल, असे सांगून ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून सांगण्यात येणारी ओळख फारसी भूषणावह नसल्याचेही अप्रत्यक्षपणे सूचित केले.
अजित पवार यांचे दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यासाठी बुधवारी सायंकाळी आगमन झाले. त्यानंतर लगेचच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पतसंस्थांमधील घोटाळ्याच्या संदर्भात बैठक घेतली. परंतु, या बैठकीकडे धनंजय मुंडे यांंनी पाठ फिरवली होती. त्याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. मात्र, गुरुवारच्या अजित पवार यांच्या काही कार्यक्रमांना धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. परंतु सायंकाळी वडवणी येथे राजेभाऊ मुंडे व त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. अजित पवार यांच्या उपस्थितीत राजेभाऊ मुंडे व बाबरी मुंडे यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असून, तो घडवून आणला तो माजलगावचे पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी. या सोहळ्यासाठी धनंजय मुंडे निमंत्रित नसल्याची चर्चा असून, पक्षप्रवेशाशी संबंधित फलकांवरही त्यांचे नाव, छायाचित्र दिसून आले नाही.