छत्रपती संभाजीनगर : परळी येथील औष्णिक वीज केंद्रातून कोणत्याही परवानगीशिवाय होणारी राख वाहतूक, वाळूउपसा यासह विविध अवैध धंद्यांमध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग असून, याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने कराड याला संरक्षण मिळत असल्याने संतोष देशमुख यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे केवळ खंडणी प्रकरणात नव्हे, हत्येच्या गुन्ह्यात कराडला आरोपी करावे, तसेच या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी बीडमध्ये काढण्यात आलेल्या मूक मोर्चातून करण्यात आली.

मेळाव्यास भाजपचे आमदार सुरेश धस, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रकाश सोळंके यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. या वेळी छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सर्वप्रथम ही मागणी लावून धरली. कराड याला अटक करून चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवावे लागेल, असे सोळंके म्हणाले.

हेही वाचा >>> ‘महादेव ॲप’मधून ९ अब्ज रकमेचा व्यवहार; सुरेश धस यांचा आरोप; धनंजय मुंडे पुन्हा लक्ष्य

कराडला अटक करा-धस

या वेळी आमदार धस यांनी पुन्हा एकदा मुंडे आणि कराड यांच्यावर टीका केली. शिरसाळा या गावी गायरान जमिनी बळकावण्यामागे वाल्मिक कराडशीशी संबंधित असणाऱ्यांचा संबंध आहे. याशिवाय वीज केंद्रातील राखेची वाहतूक करताना डोक्यावर पिस्तूल ठेवले जाते असा आरोप त्यांनी केला. या सर्व अवैध धंद्यांवर उपाय म्हणून ‘आका’ म्हणजे वाल्मिक कराडला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली.

पुस्तल परवान्यांच्या चौकशीची मागणी बीडमध्ये बाराशेंवर पिस्तुलाचे परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उतरंडीतील सर्वांची चौकशी करण्याची मागणी धस यांनी केली.वाल्मीक कराडला धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद भाड्याने दिल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्याचा संदर्भ आमदार सुरेश धस यांनी दिला. गोदावरी नदीतून दररोज ३०० हायवा वाळूचा उपसा होतो त्या कोणाच्या आहेत, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन आरोपींची हत्या ? : दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही शनिवारी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, त्यांनी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. या वेळी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरारी आरोपींचे मृतदेह आढळून आल्याचा एक ध्नवीसंदेश आपल्याला अज्ञाताकडून पाठवण्यात आल्याचे सांगितले. संबंधित संदेश आपण बीडच्या पोलीस अधीक्षकांना पाठवल्याचे सांगून, आम्ही याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.