छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली होती.
खंडपीठात सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास सुरू असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदन करण्यात आले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या न्यायालयाने विशेष तपास पथक नियुक्त करावे, या विनंतीवरून सरकारकडून सांगण्यात आले की, बदलापूर प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश होते. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी पथक स्थापन केले होते.
याप्रकरणातही खंडपीठाने पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केली असून, त्यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, तर राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.