छत्रपती संभाजीनगर : धनादेश अनादर प्रकरणात राजकीय कार्यकर्ते सुहास दाशरथे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आणि जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीकालीन न्या. रोहित जोशी यांनी कपात केली.
प्रकरणात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे कैलास आहेर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कैलास आहेर आणि सुहास दाशरथे यांच्यात झालेला जमिनीचा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. या वेळी आहेर यांनी दाशरथे यांना दिलेली रक्कम परत मागितली असता त्यांनी रकमेपोटी धनादेश दिले. मात्र, ते वटलेच नाहीत. त्यावर त्यांनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अंतर्गत कलम १३८ अन्वये तक्रार दाखल केली.
याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावणीअंती दाशरथे यांना एक वर्ष साधी कैद आणि ४५ लाख रुपये नुकसानभरपाईचा आदेश दिला. त्यावर दाशरथे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. तेथे त्यांना सहा महिने साधी कैद आणि ४५ लाख रुपये नुकसानभरपाईचा आदेश देण्यात आला.