औरंगाबाद शहरातील दहा दिवसांच्या टाळेबंदीमध्ये आतापर्यंत राज्यातील सर्वाधिक १८ हजार ८७८ अँटिजेन चाचण्या औरंगाबाद शहरात घेण्यात आल्या. तसेच आर-टी पीसीआर चाचण्या वाढविल्याने ८८७ रुग्ण आढळून आले. शहराच्या भोवताली चाचण्या केल्यामुळे लक्षणे नसणाऱ्या पण प्रसार करू शकणाऱ्या ७०० जणांना शोधण्यात यश आले. करोनासाखळी तोडण्याच्या प्रयत्नांबरोबरच योग्य नियोजनामुळे मृत्युदर ५.६१ वरून ३.८० पर्यंत खाली आणण्यात यश मिळाले असल्याचा दावा आज जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी केला. टाळेबंदीचा कालावधी शनिवारी मध्यरात्री संपणार असल्याने उद्यापासून सायंकाळी सातनंतर निर्बंधासह व्यवहार सुरळीत राहणार आहेत.

दहा दिवसांपूर्वी शहरातील वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेता संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त व लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. या काळात मोठय़ा प्रमाणात जलदगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले. गेल्या दहा दिवसांत सरासरी तीन हजार चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये अँटिजेन चाचण्या करण्यासाठी शहरात अधिक जोर लावण्यात आला. ५० हजारहून अधिक चाचण्याचे साहित्य मागविण्यात आल्यानंतर शहरात येणाऱ्या १६ मार्गावर तसेच प्रतिबंधित क्षेत्रात १६ हजार ७४३ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५७५ रुग्ण आढळून आले. तर ग्रामीण भागात एक हजार ७३२ चाचण्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण ११२ असल्याचे दिसून आले. या काळात विविध ठिकाणी कोविड उपचार केंद्रही महापालिकेकडून सुरू करण्यात आले. परिणामी टाळेबंदीच्या दहा दिवसांचा अतिशय चांगला परिणाम दिसून येईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

औरंगाबाद शहरातील मृत्युदर मे महिन्यात २.०२ वरून जूनमध्ये थेट ५.६१ वर गेला होता. योग्य रीतीने रुग्णांचे केलेले व्यवस्थापन आणि व्याधी जटिल बनण्यापूर्वी  केलेल्या उपाययोजनामुळे मृत्यू कमी झाल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला. महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय म्हणाले, ‘१७ जून रोजी एका महिन्यातील मृत्युसंख्या ९१ होती, ती जुलै १७ रोजी ८६ झाली आहे. खूप कष्टाने आपण महिनाभरात पाच मृत्यू कमी करू शकलो आहोत. आतापर्यंत १२ हजार ४६५ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. अँटिजेन चाचण्यामध्ये करोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण २८ टक्क्यांहून १५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.’ दहा दिवसांच्या कालावधीमध्ये कोठेही शासकीय कामात अडथळा आल्याची एकही घटना नोंदली नाही. रस्ते सुनसान होते. नागरिकांनी ही टाळेबंदी कसोशीने पाळली असल्याचा दावा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केला.