प्रतिउत्तरादाखल कार्यकर्त्यांना मारहाण; डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात तणाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेत जाब विचारण्यासाठी गेलेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळला. प्रतिउत्तरादाखल पत्रके फेकून निषेध नोंदविणाऱ्या एकाला अभाविप व भाजप प्रदेश युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तसेच सभागृहाच्या दरवाजाची काचही फोडली. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आले. या घटनेमुळे विद्यापीठामध्ये शनिवारी दुपापर्यंत तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविपच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वादामुळे पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला.

विद्यापीठातील  महात्मा फुले सभागृहात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानव दर्शन’ या विषयावर डॉ. अशोक मोडक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच महात्मा फुले यांची पुण्यतिथी झाली. मात्र, यानिमित्ताने विद्यापीठाने एकही कार्यक्रम घेतला नाही. केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाढण्यात ज्यांनी योगदान दिले, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकणातील एका माजी आमदाराचे व्याख्यान आयोजित करून संघ विचारांची पेरणी केली जात असल्याचा आक्षेप घेत सचिन शिंदे, कमलेश चांदणे, आनंद लोखंडे, प्रकाश नवतुरे, दिनेश चांदणे यांच्यासह कार्यकर्ते कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे यांच्याकडे गेले. मनुवादी विचारांची पेरणी विद्यापीठ प्रशासन करत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते जाब विचारत होते. त्याला विरोध करण्यासाठी गजानन सानप, सचिन जव्हेरी, सागर पाले, दीपक ढाकणे, कुणाल ढाकणे, हरिश वाघ हे कार्यकर्ते सरसावले. या वेळी जोरदार घोषणाबाजी झाली. या दरम्यान बहुजन क्रांती मोर्चाच्या सचिन शिंदे या कार्यकर्त्यांस मारहाण करण्यात आली. तसेच कुलगुरूंच्या दालनाजवळील सभागृहाच्या दरवाजाची काचही फोडण्यात आली. या सगळय़ा प्रकारानंतर कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करत कार्यकर्त्यांनी अभाविप व राष्ट्रीय स्वयंसेवक मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या सगळय़ा प्रकाराला गजानन सानप हे भाजपचे कार्यकर्ते जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली. हा सगळा प्रकार सुरू असताना विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीच्या मुख्य दरवाजाचे गेट बंद करण्यात आले.

बाहेरची कार्यकर्ते मंडळी आत येऊ देऊ नका, अशा सूचना कुलगुरू चोपडे यांनी दिल्या. चर्चेदरम्यानही घोषणाबाजी सुरूच होती. अभाविप आणि संघविरोधी घोषणा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू होत्या. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना इमारतीबाहेर काढले. त्यानंतर इमारतीसमोरही काही वेळ घोषणा सुरू होत्या. या प्रकरणात कुलगुरूंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचा दूरध्वनीही नंतर बंद होता.

सचिन शिंदे यांनी जातीयवाचक शिवीगाळ केल्याचा तसेच मारहाण केल्याचे पत्रकारांना सांगत मनुवादी विचार विद्यापीठामध्ये रुजविले जात असल्याचा आरोप केला. या अनुषंगाने बोलताना गजानन सानप म्हणाले, ‘आम्हाला व्याख्यान ऐकण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. झालेला प्रकार निंदनीय आहे. या प्रकारानंतर आम्ही निघून आलो. ज्यांनी बहुजन क्रांती मोर्चाच्या नावावर पत्रके उधळली, तो कार्यकर्ता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे. विचार स्वातंत्र्याला तिलांजली देण्याचा हा प्रकार आहे.’

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकही कार्यक्रम होत नाही. ज्यांनी समतेसाठी काही एक काम केले नाही, केवळ संघ वाढविण्याचे काम करणाऱ्यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम होतात, हे चुकीचे असल्याचे सचिन शिंदे म्हणाले.