छत्रपती संभाजीनगर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे ९ मे रोजी बजरंग दलाचे ३४ लाख कार्यकर्ते देशभर सामूहिक ‘हनुमान चालिसा’ पठण कार्यक्रम करतील, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथे बजरंग दल आणि दुर्गावाहिनी या दोन संघटनांच्या वतीने सुरू असणाऱ्या प्रशिक्षण वर्गास भेट देण्यासाठी ते आले होते. या निमित्ताने आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
‘काँग्रेसने कर्नाटक, छत्तीसगड आणि बिहारमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्याची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातही आमदार अशोक चव्हाण यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे.
निवडणूक असल्याने मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण व्हावे म्हणून ही मंडळी अशा प्रकारची वक्तव्ये करीत असतात. त्यांनी निवडणुकीपूर्वी विषय काढल्याने निवडणुकीपूर्वी म्हणजे ९ मे रोजी हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी विषय छेडला हे त्यांचे दुर्दैव,’ अशी भूमिका व्यक्त करत या कार्यक्रमामुळे कर्नाटकात कोणताही आचारसंहिता भंगाचा प्रश्न येणार नाही, असेही परांडे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
समाज जीवनात अनेक सार्वजनिक कार्यक्रम सुरू असतात. मतदानाच्या दिवशी मृत्यू होतात. किंवा अन्य घरगुती सोहळे होतात. त्याचा आचारसंहितेशी संबंध नाही. समाज जीवनात ‘हनुमान चालिसा पठण’ हा नियमित कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.
देशभक्तांच्या बजरंग दलाची तुलना देशविघातक कारवाया करणाऱ्या ‘पीएफआय’शी करण्याचा काँग्रेसने केलेला प्रयत्न निषेधार्ह असल्याचे सांगत त्यांनी समिलगी विवाह कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. अनेक पैलू समजून घेऊन भारतीय विवाह संस्थेतील विवाह म्हणजे केवळ करार नसून संस्कार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने त्याचा विचार व्हावा अशीही भूमिका मांडली. जगातील ३० देशात सध्या विश्व हिंदू परिषदेचे काम सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.