छत्रपती संभाजीनगर – बीड शहरात नगराध्यक्षपद निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना एक तरूण रविवारी तलवार घेऊन फिरत असताना निदर्शनास आला. संबंधित तरुणावर तातडीने कारवाई करत त्याला अटक केली असून, त्याच्या घराच्या झडतीत चार मोठ्या तलवारी आढळून आल्याने खळबळ उडाली.

बीड शहर पोलिसांनी अजिजपुरा भागातील एका प्रार्थनास्थळाच्या नजीक ही कारवाई केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांकडून अवैध शस्त्रधारकांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी शेरसिंग हिंदू सिंग टाक, (वय ५५, रा. वडवणी) याच्याकडून आणखीही अवैध शस्त्रे मिळण्याची शक्यता आहे, असे सांगितले.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सर्व पोलिस ठाणे प्रमुखांना निवडणूक काळात अवैध शस्त्रे जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने बीड शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

कोणाकडेही अवैध शस्त्र, तलवार, दारुगोळा किंवा गावठी पिस्तूल असल्याची माहिती असल्यास सांगण्याचे आवाहन करून ७५८८८०७७७४ किंवा पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव यांच्या ९०२१२१६२५६ या क्रमांकावर माहिती कळवावी. माहिती कळवणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही बीड पोलिसांकडून कळवण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खेडकर, उपनिरीक्षक महेश जाधव, गणेश कुमावत तसेच अंमलदार गहिनीनाथ बावनकर, राम पवार, सुशेन उगले, इलियास शेख यांनी केली आहे.