छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात आणि त्यातही बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करण्याचे ‘लक्ष्य’ ठेवणारे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना भाजपने धक्का देण्याची तयारी केली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले आणि त्यांच्याच पाठबळाने मुंबई बाजार समितीचे सभापतिपद सांभाळलेले माजलगावचे नेते, भूमिपुत्र अशोक डक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. डक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ‘थांबा आणि पाहा’ असे सूचकपणे सांगत अप्रत्यक्षपणे प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
या संदर्भाने भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांसोबत मुंबईत एक गुप्त बैठकही पार पडल्याची चर्चा असून, येत्या काही दिवसांत डक यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. डक यांचा संभाव्य प्रवेश माजलगावचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांच्यासाठीही डोकेदुखी वाढवणारा, तर भाजपला चेहरा देणारा असेल.
माजलगावात सोळंके व डक हे एकाच (राष्ट्रवादी) पक्षात असले तरी दोघेही परस्परांचे राजकीय विरोधक मानले गेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डक यांनी प्रकाश सोळंकेचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे रमेश आडसकर यांना पाठिंबा दिल्याची चर्चा रंगली होती. डक यांचे वडील दिवंगत गोविंदराव डक यांनी प्रकाश सोळंके यांचे वडील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत सुंदरराव सोळंके यांचा पराभव केल्याचा इतिहास आहे. डक घराणे हे शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जातात. अखंडित राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी बीडच्या जिल्हाध्यक्षपदी डक यांची नियुक्ती केली होती. राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक म्हणूनही डक यांना मानले जाते. त्यातूनच डक यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद सोपवण्यात आले होते. अलीकडे काही राजकीय सोय, तडजोड म्हणून सभापतिपद त्यांना सोडावे लागले तरी मुंबई बाजार समितीचे व पुण्यातील महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे संचालकपदही त्यांच्याकडे आहे.
माजलगावात भाजपकडे एकही मातब्बर नेता, चेहरा सद्य:स्थितीत नाही. विधानसभेच्या तोंडावर रमेश आडसकर यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. परंतु त्यांना अपेक्षित उमेदवारी माजलगावातून मिळाली नाही. त्यानंतरही ते अपक्ष म्हणून लढले होते. नुकताच आडसकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपकडे माजलगावात मोठा चेहरा नसल्याची पोकळी आणि प्रकाश सोळंके यांच्याशी असलेले राजकीय मतभेद ओळखूनच डक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
माजलगावातील स्थानिक पातळीवर काहीशी नाराजी जरूर आहेच. त्यामुळे सध्या आम्ही ‘थांबा आणि वाट पाहा’ या भूमिकेत आहोत.
अशोक डक
मोठा राजकीय भूकंप होईल
बीड जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात येत्या काळात राजकीय भूकंप झालेला दिसेल. मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रवेशासाठी इच्छुकांची यादी मोठी आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.शंकर देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप