छत्रपती संभाजीनगर : परळी औष्णिक वीज केंद्रातील तिन्ही संचातून सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण अधिक असल्याची कबुली महानिर्मिती विभागातील अधिकाऱ्यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर दिली. या प्रदूषणामुळे श्वसननलिकांचे विकार, दम्याचा आजार बळावण्याचे प्रमाण वाढते.

परळीमध्ये हे प्रमाण अधिक आहेच. परळीमध्ये २५० मेगावॅटचे तीन संच आहेत. यातील संच २००७, २०१० आणि २०१६ मध्ये बसविण्यात आलेले आहेत. या तिन्ही संचांतून ६०० मिलीग्राम प्रति मायक्रो मिलीग्राम एवढे प्रदूषणाचे प्रमाण असावे असे अपेक्षित असते. मात्र, परळीतील तिन्ही संचांतून अनुक्रमे ८३३, ८१० आणि ७५० मिलीग्राम प्रति मायक्रो घनमिलीग्राम एवढे प्रमाण आहे. यामुळे परळीतील हवेचे प्रदूषण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

परळीतील हे प्रदूषण रोखण्यासाठी नव्याने यंत्रे बसविण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात आली असल्याचे प्रदूषण अधिकाऱ्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना सांगितले. याशिवाय परळी औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात खासगी जागेत अनेकांनी राखेचे अवैध साठे निर्माण केले आहेत. यातून होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे राख उडूनही परळी शहरात प्रदूषण होत असल्याचे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ व्यक्तींसह लहान मुलांना अधिक त्रास

हवेतील सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण वाढल्याने कोणते आजार होऊ शकतात याविषयी बोलताना छत्रपती संभाजीनगरमधील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. श्रीहास बर्दापूरकर म्हणाले, प्रदूषणास जवळपास तीन-चार हजार घटक कारणीभूत असतात. श्वसन यंत्रणेवर प्रभाव टाकणारा सर्वात मोठा घटक सल्फर डायऑक्साईड हा आहे. त्वचा, डोळे, हृदय, गर्भवती महिलांना, नवजात शिशूंची श्वास नलिकाच्या नैसर्गिक अंतररचना बिघडते. दम्याच्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास अधिक त्रास होतो. घशामध्ये खरखर वाढते. खोकला वाढतो. छाती आवळल्यासारखी वाटते. हे सारे त्रास ज्येष्ठ व्यक्ती आणि लहान मुलांमध्ये वाढतात.