भाजप कर्जमाफीच्या विरोधात नाही पण..!
भाजप कर्जमाफीच्या विरोधात नाही. मात्र, शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची ऐपत जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कर्जमाफी देऊन उपयोग होणार नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. लातूर येथे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी १५ खासदारांचा चमू १० तालुक्याच्या दौऱ्यावर होता. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी केलेल्या सूचना मुख्यमंत्र्यांना सांगू असेही दानवे म्हणाले.
खासदारांच्या भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी तरतूद वाढवून द्यावी अशी मागणी केली. या मागणीसह शेतक-यांनी केलेल्या सूचना मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले. लातूर जिल्ह्णाातील जलयुक्तची चळवळ देशासाठी दिशादर्शक ठरेल, लातूर शहरानजिकच्या मांजरानदीच्या खोलीकरणाचे काम व हरंगुळ ग्रामस्थांनी हाती घेतलेले काम अतिशय उत्कृष्ट असल्याचे दानवे म्हणाले. जलयुक्त लातूरसाठी प्रदेश भाजपच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश दिला जाणार असून लातूर शहरातील पुनर्भरण उपक्रमासांठी ५ हजार टाक्या दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त चळवळीसांठी लातूर शहर व हरंगुळ साठी सरकारने मदत दिली असून या कामाला गती देण्यासाठी सरकारचे पाऊल कृतिशील असल्याचे दानवे म्हणाले, दुष्काळाव्यतिरिक्त कोणत्याही प्रश्नांचे उत्तर देणे त्यांनी टाळले. या पत्रकार बैठकीच्या वेळी खासदार सुनील गायकवाड, नाना पटोले, प्रीतम मुंडे, संजय काका पाटील, कपिल पाटील यांच्यासह आमदार संभाजी पाटील, सुधाकर भालेराव उपस्थित होते.