scorecardresearch

भाजप कार्यक्रमाला हजेरी; भावजयीला मारहाण; शिवसेना आमदार रमेश बोरनारेंसह १० जणांविरुद्ध गुन्हा

बोरनारे यांच्या भावजयीने तक्रारीत म्हटले आहे,की त्या व त्यांचे पती हे शुक्रवारी दुपारी वैजापुरात आले होते.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

शिवसेना आमदार रमेश बोरनारेंसह १० जणांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणून वैजापूरचे शिवसेनेचे आमदार प्रा. रमेश नानासाहेब बोरनारे यांनी मारहाण केल्याची तक्रार त्यांच्या भावजयीनेच दिली आहे. याप्रकरणी बोरनारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांनी दिली.

बोरनारे यांच्या भावजयीने तक्रारीत म्हटले आहे,की त्या व त्यांचे पती हे शुक्रवारी दुपारी वैजापुरात आले होते. तेथेच आमदार रमेश बोरनारे, संजय नानासाहेब बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रंजित मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षां संजय बोरनारे, संगीता रमेश बोरनारे व दिनेश शाहू बोरनारे हेही आलेले होते. यांनी तक्रारदार महिला आणि त्यांचे पती यांना भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थिती का लावली म्हणून बेदम मारहाण तसेच शिविगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच जिवे मारण्याची धमकीही या वेळी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार वैजापूर पोलीस ठाण्यात येऊन आमदार रमेश बोरनारेंसह त्यांच्यासोबतच्या इतर नऊ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप महिला आघाडी आक्रमक

दरम्यान, या प्रकरणावरून भाजपा आक्रमक झाली आहे. औरंगाबाद जिल्हा महिला भाजप आघाडीने वैजापुरात येऊन आमदार बोरनारे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. आमदार बोरनारे यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदार भावजयीने आपण भाजप कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळेच मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

भावजयीविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

दरम्यान आमदार रमेश बोरनारेंविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी त्यांच्या भावजयीविरुद्ध वैजापूर ठाण्यात लगोलग अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आमदार बोरनारे यांचे खासगी सचिव सामदास दशरथ वाघ यांनी तक्रार दिली आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp program atrocity complaint of assault shiv sena mla akp

ताज्या बातम्या