छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विद्यापीठांमधील अभ्यास तज्ज्ञांचे एक मंडळ ‘ई स्टडीज ऑफ बोर्ड’ म्हणून स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळाद्वारे विद्यापीठांमध्ये शिकवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांवर लक्ष ठेवले जाईल.या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक सुकाणू समिती गठित केली आहे. ‘ई स्टडिज ऑफ बोर्ड’ ही नवी संकल्पना आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उच्च शिक्षण संस्थांच्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये समूह विद्यापीठांची संकल्पना आणली जात आहे.
त्यामध्ये २ ते ५ महाविद्यालयांचे मिळून समूह विद्यापीठांसोबत ई स्टडिज ऑफ बोर्डही असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ६३ व्या दीक्षांत समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत समूह विद्यापीठाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी समूह विद्यापीठासोबतच ई स्टडीज ऑफ बोर्डच्या संकल्पनेची माहिती दिली.