आजी-नातवाला धमकावून दागिन्यांची लूट
पोलीस व त्यांचे नातेवाईक राहात असलेल्या सातारा परिसरातील सुधाकर नगर पोलीस गृहनिर्माण सोसायटीत रविवारी पहाटे चड्डी बनियन टोळीने दरोडा टाकून अडीच लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. कमलनयन बजाजच्या परिसरात ही टोळी फिरत असल्याची माहिती एका निवृत्त पोलिसाने सातारा पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गस्तही वाढवली. मात्र, टोळीने त्यांना गुंगारा देत पोलिसांच्याच सोसायटीत दरोडा टाकला.
पोलीस विभागातील निवृत्त खजिनदार भाऊसाहेब सिरसाट यांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या सुधाकर नगर पोलीस गृहनिर्माण सोसायटीत एकूण १७०० प्लॉटधारक आहेत. त्यातील ५५० जण येथे वास्तव्यास आहेत. बहुतांश जण हे पोलीस विभागातील असून उर्वरितही पोलिसांच्याच नात्यातील आहेत. भाऊसाहेब सिरसाट यांची बहीण कडुबाई पवार (मूळ गाव जांबुळीघाट, ता. कन्नड) यांच्या मुलाचे येथे घर आहे. रविवारी रात्री कडुबाई व एमआयटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा नातू रितेश राकेश पवार हे दोघे झोपले होते. पहाटे सव्वातीनच्या सुमारास धाडकन मुख्य दरवाजा उघडण्यात आला. घरात चड्डी बनियनवरील पाच व्यक्ती शिरल्या. त्यांच्याजवळ चार-चार फुटाच्या लाकडी काठय़ा होत्या. िहदीत त्यांनी बोलायला सुरुवात केली. एकाने चाकूने धमकावले. भीतीने रितेश व आजी कडुबाई पवार हे दोघे एकाच खोलीत बसून होते. त्यांच्यावर टोळीतील दोघे पाळत ठेवून होते. तीन जण अन्य खोल्यांमध्ये गेले. तेथील कपाटातून व अन्य ठिकाणाहून साडे आठ तोळ्यांचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे मणी-मंगळसूत्र, एक तोळ्याची सोन्याची अंगठी, कडुबाई पवार यांचे १२ ग्रॅमचे कानातले, रितेश याचा मोबाईल, हातातील २ हजारांचे घडय़ाळ, पर्समधील रोख पाच हजार असा २ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. जाताना त्यांनी पवार यांच्या घराला बाहेरून कडी लावली. चड्डी बनियन घातलेल्या पाच जणांव्यतिरिक्त आणखी बाहेर तीन ते चार जण पाळत ठेवण्यासाठी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेनंतर रितेश याने साडेचारच्या सुमारास नातेवाईक असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे औरंगाबाद पश्चिमचे अध्यक्ष संदीप सिरसाट यांना फोन केला. त्यानंतर सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक काकडे, दरोडा प्रतिबंधक विभागाचे बाकरे, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, राहुल श्रारामे, संदीप आटोळे गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सायबरचे गजानन कल्याणकर यांच्यासह हस्त ठसेतज्ज्ञ, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानाने सातारा-कांचनवाडीपर्यंतच्या एका चौकाजवळ जाऊन तेथे घुटमळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मध्यरात्रीच पोलिसांना माहिती
सातारा परिसरात चड्डी बनियन घातलेली टोळी फिरत असल्याची माहिती मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांना एका निवृत्त सहायक पोलिसाने दिली होती. त्यानंतर गस्तही वाढवण्यात आली. मात्र, पोलीस फिरत असल्याचे पाहून चोरटय़ांनी सुधाकर नगर पोलीस गृहनिर्माण सोसायटीतच चोरीचा डाव साधला.