छत्रपती संंभाजीनगर : मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि सिल्लोड तालुक्यातील झालेल्या तुफान पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाशी, भूम परंडा तालुक्यात पावसाने अक्षरश: कहर केला. पूर स्थितीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले.
आतापर्यंत ७० जणांना लष्करी हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी आणले गेले. अजूनही काही जणांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी सांगितले. या तालुकयातील वाकी बोकी या गावात १६ जण अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीड, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसाने अनेक गावात पाणी शिरले आहे. पैठणमध्ये १५७ मिलीमीटर पाऊस नोंदविल्याने जायकवाडी धरण पुन्हा १०० टक्के भरले आहे. सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने सावखेडा, केळेगाव, घाटनांद्रा, आमठाणा गावठाण, बोरगाव बाडी, शिंदेफळ अंतर्गत वाडारवाडी हे गावे संपर्क कक्षेच्या बाहेर आहेत. मात्र गावातील नागरिक सुखरुप आहेत.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील काही वाहने वाहत भूम तालुक्यातील पारगावपर्यंत वाहत आली. बार्शी तालुक्यातील शिरसाव गावात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मांजरा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. परंडा व भूम तालुक्यातील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले.