छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगासह स्पर्धा व नागरी सेवा परीक्षेत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचाही टक्का वाढवण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने देशात २० राज्यांतील केंद्रांवर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बंद झालेले हे केंद्र आता पुन्हा सुरू करण्यातून केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून, अलीकडच्या काळात सरकारच्या प्रतिमेतील बदलही मानला जात असल्याच्या दृष्टीने या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

हज कमिटी ऑफ इंडियाने मुंबईतील हज हाऊस रेसिडेन्शियल कोचिंग इन्स्टिट्यूट (एचएचआरसीआय) येथे नागरी सेवा परीक्षांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. २२ मे रोजी, एचसीआयने नागरी सेवा परीक्षा २०२६ (प्राथमिक -सह-मुख्य) साठी मोफत निवासी प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवणारी अधिसूचना जारी केली. भारतीय प्रशासकीय सेवा आणि संबंधित सेवांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आणि प्रशिक्षण सुविधा केंद्र २००९ मध्ये सुरू झाले आणि २५ विद्यार्थ्यांसाठी अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत झाली.तथापि, एचसीआयने २०२३ नंतर नवीन तुकडीसाठी अधिसूचना जारी केली नाही. हे केंद्र पुन्हा सुरू व्हावे, अशी मागणी मुस्लिम समाजातून सरकारकडे करण्यात येत होती. अखेर सरकारने प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री सलीम जहांगीर यांनी दिली.

१३ जुलै २०२५ रोजी देशभरातील २१ केंद्रांवर या प्रवेश परीक्षा घेतल्या जातील. एकूण १०० उमेदवारांची निवड केली जाईल. त्यापैकी ८० टक्के जागा मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी राखीव असतील आणि २० टक्के जागा अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असतील. २१ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. ११ ऑगस्टपासून वर्ग सुरू होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हज कमिटीचे प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरण रिजिजू यांनी हे केंद्र सुरू केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेशी संबंधित कार्यक्रमही जाहीर झाला आहे.– सलीम जहांगीर,प्रदेश महामंत्री, अल्पसंख्याक मोर्चा.