छत्रपती संभाजीनगर : ढगाळ वातावरण कायम ठेवून पावसाने गुरुवारपासून उसंत घेताच केशर आंब्याचा दर पुन्हा शंभर ते दीडशे रुपये किलोपर्यंत पोहोचला. मागील पंधरा दिवसांपासून पावसाळी वातावरण असताना आणि आठवडाभरापासून प्रत्यक्ष पावसाचा धुमाकूळ सुरू असताना केशर आंब्याचा दर शंभर रुपयांत दीड ते दोन किलोपर्यंत उतरले होते.

यंदाच्या ऐन हंगामातच केशरला पावसाळी वातावरणाने गाठले होते. गेल्या चार दिवसांत पावसाळी वातावरणाने आंब्याच्या बाजार समितीतील आवकेमध्येही मोठी तफावत दिसून आली. २७ मे रोजी ६४० क्विंटलची जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झालेली होती. दर किमान ५ हजार, तर कमाल १४ हजार रुपये क्विंटलपर्यंत होता. सर्वसाधारण दर ९ हजार ५०० रुपयांपर्यंत होता. २९ मे रोजी बाजार समितीत अवघा १५३ क्विंटल आंबा दाखल झालेला होता. दर किमान ४ हजार, तर कमाल ७ हजार रुपये होता. सर्वसाधारण दर ५ हजार ५०० रुपये एवढा होता. या आंब्यामध्ये ६० ते ७० टक्के आंबा हा केशर असल्याचे व्यापारी सांगतात.

पावसाळी वातावरणात आंब्याची मागणी आणि दरही घसरलेला असतो. मात्र, गुरुवारपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर केशरचा दर शंभर रुपये किलो ते सव्वा किलोपर्यंत होता. त्याअगोदर शंभर रुपयांत दोन किलोपर्यंत केशरचा दर पोहोचलेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.