छत्रपती संभाजीनगर : अपघाताने माणसं दुरावतात. अपघातानेच माणसं जवळही येतात. पण आपल्यातून गेलेली माणसं पुन्हा परत येत नाहीत, असे सांगत राज्याच्या पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे वडील, दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या. आज बऱ्याच वर्षांनी आम्ही मुंडे कुटुंबीय एकत्र आलो आहोत, असे सांगताना त्या भावूकही झाल्या होत्या.
परळीजवळील पांगरी येथील गोपीनाथ गडावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे, बदामराव पंडित, गजानन घुगे, आमदार मुटकुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे यांनीच केवळ मुंडे परिवाराच्या वतीने भावना व्यक्त केल्या. नुकतेच निधन झालेले माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे छायाचित्रही गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात लावण्यात आले.
विपश्यना शिबिर केल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. परंतु, त्यांनी भाषण केले नाही. दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आदींनीही दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.