छत्रपती संभाजीनगर : भरचौकात पण एकटी तरुणी पाहून तिला छेडण्याच्या विचारातून अश्लील हावभाव करणाऱ्या एका परप्रांतीय ट्रकचालकाच्या चांगलेच अंगलट आले असून, त्याच्या सणसणीत कानाखाली लगावून शहरातील एका तरुणीने मराठवाडी हिसका दाखवला. तरुणी एवढ्यावरच थांबली नाही तर एक कानाखाली न लगावता सलग तीन सणसणीत फटके लगावून त्या ट्रकचालकाला पाया पडून माफी मागायला लावली.
छत्रपती संभाजीनगरातील अत्यंत गजबजलेल्या, हजारोंचा राबता असलेल्या क्रांती चौकात मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली असून, या “क्रांती”कारक घटनेची समाजमाध्यमावर तुफान चर्चा सुरू झाली आहे. त्याचे झाले असे की, दिवाळीच्या सुट्ट्या संपून मंगळवारपासून शाळा-महाविद्यालये सुरू झाले आहेत. महाविद्यालयात जाण्यासाठ क्रांती चौकात एक १७ वर्षीय तरुणी आपल्या मैत्रिणीची वाट पाहत उभी होती. याच दरम्यान क्रांतीचौक परिसरात एक ट्रकचालक आला. या ट्रकचालकाने तरुणी एकटीच उभी असल्याचे पाहून तिच्याकडे पाहात अश्लील हातवारे इशारे करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तरुणीने हातातील घड्याळाकडे पाहात मैत्री केव्हा येईल, या विचाराने त्या ट्रकचालकाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. परंतु तो विक्षिप्त तरुण इशारे करणे थांबवत नव्हता. उलट अधिकच त्याचे इशारे वाढल्याच पाहून संतापलेल्या धाडसी तरुणीने थेट त्याच्या दिशेने धाव घेतली आणि सणसणीत तीनवेळा कानाखाली लगावल्या.
क्रांती चौकासारख्या गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याचे वृत्त काही क्षणातच वाऱ्यासारखे पसरले. क्रांती चौकातच कर्तव्यावर असलेले एक पोलीस अमलदारांपर्यंत वृत्त येताच त्यांनीही घटनास्थळी तातडीने धाव घेऊन नेमका काय हा प्रकार याचा अंदाज घेतला. तरुणीजवळ जाताच त्या ट्रकचालकाकडे पाहून रूद्र अवतार धारण केलेल्या तरुणीचा एकूण रागरंग आणि संतापलेल्या अवस्थेतून येणारे बोलणे पाहून नेमका काय प्रकार घडला असावा याचा अंदाज बांधला. अंमलदार धावतच त्या तरुणीजवळ गेले. त्यानंतर पोलीसही आलेले पाहून पाचावर धारण बसलेल्या ट्रकचालकाने आता ” भागने वाले की शब्बास की” म्हणत तेथून काढता पाय घेण्यासाठी त्या तरुणीची पाया पडून माफी मागण्यास सुरुवात केली. मात्र दुर्गावतार धारण केलेली तरुणीही काही कमी नव्हती. तिनेही आपला कणखर बाणा दाखवत बाजूला जाणे पसंत करत त्याची माफीही स्वीकारली नाही. अखेर याच दरम्यान दामिनी पथकही दाखल झाले. पथकाच्या निर्मला अंभोरे यांच्या हस्तक्षेपानंतर क्रांती चौक पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
या सर्व प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.तरुणीला छेडणाऱ्या त्या ट्रक चालकावर कारवाई करण्यात आली. त्यातून त्याचे नाव शिवराम तानाराम देवासी असल्याचे आणि तो ४८ वर्षाचा असून, कर्नाटकातील हुबळीसारख्या मोठ्या शहरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. शिवराम हा शहरातील मोंढ्यात माल उतरवण्यासाठी म्हणून आला होता. माल उतरवल्यानंतर त्याने मापटेही मारले होते. म्हणजे मद्यपान केले होते. मद्यपानाच्या नशेतच शिवरामने क्रांती चौकात मैत्रीची वाट पाहत उभ्या असलेल्या त्या तरुणीला छेडले होते. त्यातून घडलेल्या वरील घटनेची शहरभर चर्चा सुरू असून, धाडसी तरुणीचे कौतुकही होत आहे. विशेषतः समाजमाध्यमावर धाडसी तरुणीचे कौतुक होत असून छत्रपती संभाजीनगरमध्ये काय चालले आहे, अशी विचारणाही करण्यात येत आहे.
