छत्रपती संभाजीनगर : संसद भवनाच्या उद्घाटनास होणारा विरोध केवळ पोटशूळ आहे. तीन वर्षांत एवढे मोठे कामे झाले, त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळेल म्हणून ही पोटदुखी आहे. त्यांच्या कामाचा वेग अधिक असल्याने पहिला विरोधक दुसऱ्याच्या दारी, दुसरा तिसऱ्याच्या दारी ही प्रक्रियाही सुरू आहे. पण आम्ही मात्र कोणाचा दारात न जाता ‘शासनच आपल्या दारी’ आणत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांच्या हस्ते ५५१ कोटी रुपयांच्या योजनांचा लाभ देणाऱ्या योजनांची रक्कम व प्रत्यक्ष वस्तू लाभार्थीना देण्यात आल्या.

कन्नड तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम शुक्रवारी घेण्यात आला. या कार्यक्रमास कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती. हे शासन आल्यापासून पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठी प्रगती करण्याचा संकल्प केला जात असून समृद्धी महामार्ग विकास प्रक्रियेची गती बदलणारा ठरेल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. डबल इंजिन सरकारमुळे शेतकरी व सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन आयुष्य बदलू लागल्याचा दावा त्यांनी केला.

दानवे यांची राज्य सरकारवर टीका

‘शासन आपल्याने दारी’ या कार्यक्रमासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ‘ तनाने- धनाने’ मदत केली आहे. लोक आणण्याशिवाय तहसीलदारास ५० हजार रुपये, कृषी साहाय्यकास १२ हजार रुपये व तलाठय़ास सहा हजार रुपये देण्याचे ‘आदेश’ सुटले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. कन्नड येथील या कार्यक्रमाच्या खर्चाबाबतची ही माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच आपल्याला दिल्याचे दानवे म्हणाले.