scorecardresearch

औरंगाबादमध्ये सभा घेण्यास राजकीय पक्षांची चढाओढ; राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरे, ओवेसीसुद्धा घेणार सभा

राज ठाकरे यांनी ज्या मैदानात सभा घेतली होती त्याच औरंगाबादमधील मैदानात सभा घेण्यासाठी आता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

औरंगाबादमध्ये सभा घेण्यासाठी आता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी ज्या मैदानात सभा घेतली होती त्याच मैदानात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. याशिवाय ओवेसी त्याच मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचं एमआयएमनं जाहीर केलं. त्यामुळे आगामी काळात हे मैदान औरंगाबादमध्ये राजकीय पक्षांच्या जाहीर सभांमुळे गाजणार आहे. राज ठाकरेंनंतर हे सभेचं ठिकाण राजकीय पक्षांचं आवडतं ठिकाण झालंय की काय असाही प्रश्न विचारला जात आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे ८ जून रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. शिवसेनेनं या सभेची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राज्यभरातून शिवसैनिक या सभेला उपस्थित राहतील. राज ठाकरे यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी जमवण्याच्या प्रयत्नात शिवसेना असणार आहे. ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती त्याच मैदानावर आता राज यांचे बंधू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.

या सभेसाठी मैदान मिळण्यासाठी लागणारी परवानगी मिळाली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मैदान देण्यास मान्यता दिली आहे. सभेसाठी लागणारी पोलिसांची परवानगी शिवसेनेला अजून मिळालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांत ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ज्या मैदानातून राज ठाकरे यांनी भाषण केलं त्याच ठिकाणी ही सभा होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या ८ जूनच्या या सभेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेने पाठोपाठ आता एमआयएमनीसुद्धा औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. महत्वाचं म्हणजे एमआयएमनंसुद्धा त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. एमआयएमच्या या सभेला खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित असणारा आहेत अशी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. आम्हाला सभा घेण्यापासून कोणी अडवू शकत नाही, असा इशाराही खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

हेही वाचा : रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते का? राज ठाकरे म्हणतात…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेनंतर सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सभेत नियमापेक्षा जास्त लोकांची गर्दी आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेलं भाषण तपासून राज यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray and asaduddin owaisi going to take public meeting in aurangabad after raj thackeray pkd

ताज्या बातम्या