सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : तुळजाभवानी मंदिरात कुठे पुरातत्त्वीय जुनी फरशी तर काही ठिकाणी शहाबादी फरशी. देवीच्या सिंहासनाचा भाग अजूनही लाकडी. त्यात काही बदल करण्याची आवश्यकता वर्षांनुवर्षांची. मंदिराचे मूळ रूप जशास तसे उभे राहावे आणि असे करताना भाविकांनाही नव्या सुविधाही पुरातत्त्वीय दृष्टीने विकसित झालेल्या दिसाव्यात, अशी प्रक्रिया आता हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाणी व्यवस्थापनापासून ते वीज व्यवस्थापनाबाबत भविष्यात होणारी कामे मंदिराच्या जुन्या रूपाला हानी पोहोचविणार नाही किंबहुना मंदिर अधिक झळाळून निघेल, अशा प्रकारचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निविदाही नुकत्याच प्रकाशित करण्यात आल्या. मंदिरात कुळाचार करण्यावरून सुरू असणारा वाद एका बाजूला सारून मंदिर विकासाचा वेग मात्र कायम ठेवला जात असल्याचे दिसून येत आहे.

तुळजाभवानी मंदिरात एक वस्तुसंग्रहालयही आहे, मात्र त्याचा उपयोगच भाविकांसाठी होत नाही. तसे कुठले धोरणच ठरलेले नव्हते. त्यामुळे शिवकालीन मंदिरातील दागदागिने, तत्कालीन पत्रव्यवहार, त्याबाबतची कागदपत्रे असा मोठा ऐतिहासिक ठेवा भाविकांपर्यंत पोहोचतच नाही. हे वस्तुसंग्रहालय कसे असावे, त्यात भाविकांचा सहभाग कसा असावा, कोणती माहिती कशी पद्धतीने प्रस्तुत केली जावी यांसह मंदिरातील सर्व अंगांचा पुरातत्त्वीय अंगाने अभ्यास करून कसे बदल करावेत, याचे नियोजन वास्तुविशारद व्यक्तीने वा एजन्सीने करून द्यावी, अशी निविदा काढण्यात आलेली आहे. तुळजाभवानी मंदिराचा कळसाच्या भागाला अगदी सिमेंटही लावण्यात आलेले आहे. मंदिराचे मूळ रूप आणि कळसाचा भाग त्यामुळे वेगवेगळे दिसतात. त्याचा पुरातत्त्व वारसा जपता यावा यासाठी आता मंदिर प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

या अनुषंगाने बोलताना उस्मानाबादचे जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले की, मंदिर विकासाच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर मंदिरातील मूळ रूपाला बाधा येऊ नये अशी रचना करायला हवी. अगदी मूर्तीची झीज थांबविण्यासाठीही तरतूद करण्यात आलेली आहे. मंदिरातील वेगवेगळय़ा मूर्ती, फरश्या, भाविकांची गर्दी नियंत्रण यांसह वास्तूमध्ये होणाऱ्या बदलांना उगीच आधुनिक रूप दिल्याने बऱ्याचदा मंदिर मूळ रूपात राहात नाही. त्याचे मूळ रूप टिकून राहावे म्हणून राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी मंदिराची नवीन घडी पुरातत्त्वीय अंगाने घालून देण्याची विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केली. आता त्यासाठी वास्तुविशारद- तंत्रज्ञ आणि मार्गदर्शक नेमले जाणार आहे.  आपण एका ऐतिहासिक वास्तूमध्ये जात आहोत याचा भाविकांनाही अभिमान वाटावा, अशी रचना हाती घेण्याचे ठरविले आहे.

तुळजाभवानी मंदिराच्या पुरातत्त्वीय विकास आराखडाबाबत बोलताना पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे म्हणाले की, अगदी स्वच्छतागृहापासून ते वीजजोडणीपर्यंत कोणत्या स्वरूपाने काम केले जावे, याची मार्गदर्शिका तयार केली जात आहे. ‘साइड मॅनेजमेंट प्लान’ तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंदिरातील प्रत्येक गोष्ट आता पुरातत्त्वीय अंगाने पुढे जाईल, अशी व्यवस्था करत आहोत.  तुळजाभवानी मंदिरात गोमुख आणि कल्लोळतीर्थ अशा दोन पाणी वापराच्या सुविधा आहेत. कल्लोळात आंघोळ करणे आणि गोमुख तीर्थ प्राशन करणे यासाठी रांगा लागलेल्या असतात. पाणी व्यवस्थापनाचा स्वतंत्र भाग सांभाळावा लागतो. पण तेथेही कसे आणि कोणते बदल करावेत यांसह विविध पैलूंवर अभ्यास करून त्याचा अहवाल देण्यासाठी आता निविदा मागविण्यात आलेल्या आहेत.