छत्रपती संभाजीनगर : ‘ औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड’ या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहाची मागणी तपासून पाहू, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गाेयल यांनी म्हटले आहे. या वसाहतीमध्ये ५० एकरात हे सभागृह करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, दिल्ली येथील भारत मंडपम् एवढी गरज छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार नाही, असे कारण देत या प्रस्तावावर पियुष गोयल यांच्या बैठकीमध्ये नकारात्मक सूर उमटल्याचे सूत्रांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. मात्र, सर्व शक्यता तपासून यावर निर्णय घेतला जाईल असे उत्तर गोयल यांनी पत्रकार बैठकीमध्ये दिले. आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहाऐवजी प्रदर्शन सभागृह बांधण्याचा प्रस्तावही उद्योजकांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. १२०० कोटी रुपये खर्चून त्या इमारतींचा सातत्याने वापर होणार नसेल तर अशी इमारत करण्याऐवजी प्रदर्शन सभागृह करण्याचा प्रस्ताव पियुष गोयल यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे.

शेंद्रा ते वाळुज या दोन औद्योगिक वसाहतींना जोडणारा उड्डाण पुल करण्याच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असेही गोयल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. येत्या काळात दोन लाख रोजगार या औद्योगिक वसाहतीमधून मिळावे असे प्रयत्न असून अलिकडेच ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा उल्लेख गोयल यांनी केला.

कौशल्य विकास केंद्र

‘ ऑरिक ’ औद्योगिक वसाहतीमध्ये २० हजार चौरस फुटांवर कौशल्य विकास केंद्र आणि नवउद्यमींसाठी १० हजार चौरस फुटाची जागा ‘ स्टार्ट अप इनक्युबेशन सेंटर’ साठी देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या परिसरातील ऑरिक हॉलमधील सभागृहाचे जागेचा दर ५० रुपये चौरस फुटावरुन २५ रुपये चौरस फुटापर्यंत कमी करण्याचा निर्णयही गोयल यांनी जाहीर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीएसएनएल टॉवर

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायचे होते. पण औद्योगिक वसाहतीमध्ये पुरेसे ‘ नेटवर्क’ च उपलब्ध नव्हते. ‘बीएसएनएल’ला टाॅवरसाठी जागाही दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता ज्या खासगी कंपन्या येतील त्यांना ते द्या, असे केंद्रीय मंत्र्यांना सांगावे लागले.