scorecardresearch

 ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरानंतर संभ्रम; ध्रुवीकरणाच्या खेळावर पडदा

शिवसेना व रा. स्व. संघातील मंडळी गेली अनेक वर्षे शहराला ‘ संभाजीनगर’ असेच संबोधत.

 ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरानंतर संभ्रम; ध्रुवीकरणाच्या खेळावर पडदा
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

नव्या समीकरणाची जुळवाजुळव

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यास केंद्र सरकारने मंजुरी देण्यास हरकत नसल्याची अधिसूचना जारी केल्यानंतरही हा नवीन बदल लिखित स्वरूपात कधीपासून अमलात आणायचा याविषयी विविध वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम असल्याचे दिसून आले. प्रत्येक विभाग स्वतंत्र आदेश देईल त्यानंतर नाव बदलण्यास सुरुवात होईल. नामांतराचे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले जाणार आहेत. दरम्यान नामांतर झालेच आहे, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला. सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने काही फलकांवर नावेही बदलण्यात आली. एवढे दिवस सुरू असणारा नामांतराच्या ध्रुवीकरणााचा खेळ आणि नव्या समीकरणाची जुळवाजुळव जिल्ह्यात सुरू झाली आहे. 

 १९८८ पासून औरंगाबादचे नाव बदलण्याचा घाट घातला जात होता. औरंगजेबाचे उदात्तीकरण होत असल्याची मानसिकता घडवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी सूचना केली. शिवसेना व रा. स्व. संघातील मंडळी गेली अनेक वर्षे शहराला ‘ संभाजीनगर’ असेच संबोधत. मात्र, महापालिकेत दोनदा ठराव झाल्यानंतर तसेच दोनदा नामांतराच्या झालेल्या प्रयत्नांना न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. नामांतराचा न्यायालयीन लढा सुरू असतानाच नामांतरास केंद्राची मान्यता मिळाली. पण हे नाव कधीपासून वापरायचे याचे निर्देश वेगवेगळे विभागप्रमुख देतील, असे प्रशासकीय अधिकारी सांगत होते.  त्यामुळे नामांतर झाले तरी संभ्रम कायम आहे.

जलील यांची तिरकस टिप्पणी

नामांतर घडवून आणल्यामुळे आता मतांच्या ध्रुवीकरणाची नवी जुळवाजुळव भाजप व शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता आहे. नामांतराची ही प्रक्रिया पाडणे सत्ता असल्याने भाजपला शक्य झाले पण त्यामुळे विकासाच्या अनेक योजना लगेच मार्गी लागतील, आठ दिवसाला येणारे पाणी दररोज येऊ शकेल अशी तिरकस टिप्पणी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 03:21 IST
ताज्या बातम्या