परभणी शहरातील मोहम्मदीया मशिदीमध्ये २१ नाव्हेंबर २००३ला झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आरोपातून बजरंग दलाचे राकेश दत्तात्रय धावडेसह चार जणांची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मुकुलिका जवळकर यांनी गुरूवारी निर्दोष मुक्तता केली. या बॉम्बस्फोटात एक ठार, तर ३४ जण जखमी झाले होते. या खटल्याचा निकाल १३ वर्षांनी लागला. निकालाच्या पाश्र्वभूमीवर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२१ नोव्हेंबर २००३ रोजी रमजान महिन्यात मदिना नगरमधील मोहम्मदीया मशिदीमध्ये दुपारच्या नमाजानंतर दोन बॉम्बस्फोट झाले. यावेळी ३०० ते ३५० लोक नमाज अदा करीत होते. पेशइमाम अब्दुल खदीर शेख जाकीर यांनी नमाज अदा केल्यानंतर दुवा मागताना हे बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात ३४ लोक जखमी झाले. जखमींपकी अब्दुल समद अब्दुल जब्बार यांचा हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. नंतर जमाव संतप्त झाल्याने परभणी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

मशिदीचे पेशइमाम अब्दुल खदीर यांच्या तक्रारीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एम. कुलकर्णी यांनी बॉम्बस्फोटाची एक महिना चौकशी केली. त्यानंतर तपास सीआयडीकडे व सीआयडीकडून एटीएसकडे वर्ग करण्यात आला. बॉम्बस्फोटानंतर तीन वष्रे आरोपींचा शोध लागला नव्हता.

५ एप्रिल २००६ रोजी नांदेड येथे निवृत्त कार्यकारी अभियंता लक्ष्मण राजकोंडवार यांच्या घरात बॉम्ब तयार करीत असताना प्रचंड स्फोट होऊन त्यात दोघे जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले. या जखमींना परभणीच्या बॉम्बस्फोटात आरोपी करण्यात आले. जखमी संजय चौधरी यांनी नार्कोटेस्टमध्ये आपण आरएसएस व बजरंग दलाचे सदस्य असल्याचे कबूल केले. २१ नोव्हेंबर २००३ मधील परभणी, ऑगस्ट २००४ मधील जालना व पूर्णा येथील मशिदीवर आपणच बॉम्बस्फोट केल्याचेही त्यांनी पोलिसांना जबाबात सांगितले. त्यानंतर बजरंग दलाचे राकेश धावडे (रा. पुणे), योगेश देशपांडे, मारोती केशव वाघ, संजय चौधरी (सर्व रा. नांदेड) यांना अटक करण्यात आली.

या सर्व आरोपींनी अभिनव भारतच्यावतीने घेण्यात आलेल्या अतिरेकी प्रशिक्षण शिबिरात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही तपासात उघड झाले होते. जिल्हा न्यायालयात हा खटला १३ वष्रे चालला. आरोपी राकेश धावडे हा मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असल्याने मोक्का अंतर्गत कारागृहात आहे. त्याला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. जवळकर यांनी सबळ पुराव्याअभावी चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे व्ही. जी. पारेख यांनी ५१ साक्षीदार तपासले.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court acquits four accused in mecca masjid blast case
First published on: 19-08-2016 at 00:34 IST