मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा पुतण्या रिजवान कासकर आणि दोन व्यावसायिकांची विशेष मोक्का न्यायालयाने शुक्रवारी २०१९ सालच्या खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका केली. गेल्या पाच वर्षांपासून हे तिघेही या प्रकरणी अटकेत होते. कासकर याच्यासह अहमदराजा अफरोज वधारिया आणि अश्फाक टॉवेलवाला यांची विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
पोलिसांच्या आरोपांनुसार, विकासकाच्या तक्रारीनंतर या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तूंची आयातही करतो. याच व्यवसायामुळे तो टॉवेलवाला यालाही ओळखत होता. त्यांच्यात व्यावसायिक व्यवहारही होत होते. टॉवेलवाला याने तक्रारदाराचे १५.५ लाख रुपये थकवले होते. वारंवार मागणी करूनही टॉवेलवाला याने ही रक्कम तक्रारदाराला दिली नाही. त्यानंतर, १२ जून २०१९ रोजी रात्रीच्या सुमारास तक्रारदाराला आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरून फोन आला. दाऊदचा हस्तक छोटा शकील याने टोळीचा सदस्य फहीम मचमच याच्यामार्फत हा दूरध्वनी केला होता. तसेच, टॉवेलवाला याच्याकडे पैशांची मागणी न करण्याचे तक्रारदाराला धमकावले होते. त्यानंतर, कासकर यानेही टॉवेलवाला आणि वधारिया यांच्यासह तक्रारदाराला थकबाकी माफ करण्याची धमकी दिली होती.
हेही वाचा : खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध
आरोपींविरोधात तक्रारदाराला धमकावल्याचे पुरेसे पुरावे आहेत. त्यात, दूरध्वनीवरील संभाषणाचा प्रामुख्याने समावेश असल्याचा पोलिसांचा दावा होता. टॉवेलवाला यानेही कबुलीजबाब देताना इतर दोन आरोपींसह गुन्हा केल्याचे कबूल केले होते, असाही दावा पोलिसांनी केला होता. दरम्यान, या खटल्यात शकील आणि मचमच यांना फरारी आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने पोलिसांना दिले. कासकर आणि अन्य दोन आरोपींविरोधात पोलिसांनी २३ साक्षीदार तपासले व इलेक्ट्रॉनिक पुरावेही सादर केले.