छत्रपती संभाजीनगर : चित्रकलेची एक स्पर्धा आम्ही घेतली होती. त्यात एका मुलाने चित्रामध्ये हिरव्या रंगाचा सूर्य दाखवला होता. त्यामुळे आपणही प्रभावित झालो. त्या मुलाशी संवाद साधला तेव्हा त्याने हिरवा सूर्य असला तर… आणि त्यातूनही काही अर्थ ध्वनित झाले असते, अशी संकल्पना मांडली. त्यातून मुलांची सर्जनशीलता लक्षात आली, असे सांगत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गुजरातच्या दीव-दमण येथील ज्येष्ठ चित्रकार प्रेमजीत बारिया यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेलाही (एआय) आव्हान देणारी ताकत सर्जनशीलतेमध्ये दडल्याचा विश्वास दिला.

येथील एकनाथ नाट्य मंदिरमध्ये बुधवारपासून चतुर्थ पद्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. गुरुवारी दुपारच्या संवादसत्रात मेधा पाध्ये-आठल्ये व उदय भोईर यांनी कला, हेरिटेज स्केच कलाकार असलेले प्रेमजीत बारिया यांना बोलते केले. यावेळी त्यांनी मुलांना काय संदेश द्याल, या प्रश्नावर त्यांचे काही अनुभव मांडले. त्यात वरील स्पर्धेच्या विषयानुषंगाने बारिया यांनी एआयमुळे नवे आव्हान उभे राहिल्याच्या अनामिक भीतीवर भाष्य केले.

सर्जनशीलता हीच तुमच्यातील शक्ती असून, त्यावरच आपण आपल्याला घडवू शकतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची एक आठवणही त्यांनी सांगितली. आपण काढलेली चित्रे पंतप्रधानांनी त्यांच्या समाजमाध्यमावरून प्रसारित केली, याचा मनस्वी आनंद झाल्याचे सांगून त्यांनी जीवनात साधेपणा हवा आणि तो ठेवता आला पाहिजे, कारण लहान व्यक्तीसुद्धा तुमची ओळख ठेवतो, असा विचार मांडला. आपला परिचय साधेपणामुळेच आहे, असेही ते म्हणाले.

फेस्टिव्हलमध्ये सकाळच्या सत्रात बुद्धिबळपटू भाग्यश्री साठे-ठिपसे, हरियाणातील रोहतक येथील आचार्य सुकामा यांच्याशी तर दुपारच्या सत्रात डाॅ. ए. एस किरण कुमार, पं. सुरेश तळवलकर या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. सायंकाळी सावनी तळवलकर यांचे तबला वादन झाले. संवादिनीवर अभिजित शिनकर होते. तर कजाॅनवर ईशान परांजपे, कलाबशवर ऋतुराज हिंगे यांनी सादरीकरण केले.

आज समारोप

ज्ञानयज्ञ फाऊंडेशन आयोजित या फेस्टिव्हलचा शुक्रवारी समारोप असून, सकाळी क्रीडा, जलतरणपटू व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मुरलीकांत पेटकर यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. समारोप लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी यवतमाळ येथील सुभाष शर्मा व उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथील दिलशाद हुसैन यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. शर्मा यांना शेती क्षेत्रात तर हुसैन यांना कला, पितळ नक्षीकामासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.