छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात पोलीस चौकी जाळून टाकण्यापर्यंतचे शौर्य दाखवून रझाकारांच्या तोंडचे पाणी पळवलेल्या रणरागिणी तथा मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असा गौरव ज्यांचा केला जायचा त्या दगडाबाई देवराव शेळके यांचे स्मारक बदनापूर तालुक्यातील (जि. जालना) धोपटेश्वर येथे उभारण्याची घोषणा २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. परंतु दोन वर्षांमध्ये ना निधी मिळाला ना स्मारकाची जागा ठरली.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्याची एक प्रथा मागील काही वर्षांमध्ये रुढ झाली होती. काही वर्षे बैठक घेण्यात आली. तर काही वर्षांमध्ये बैठक घेण्याचे शिताफिने टाळण्यातही आले होते. परंतु राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन परिवर्तन झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळात छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्तिसंग्रामाच्या आदल्यादिवशी म्हणजे १६ सप्टेंबर २०२३ रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत रझाकारांना सळो की पळो करून सोडलेल्या लढवय्या महिला दगडाबाई शेळके यांचे स्मारक उभे करण्याची घोषणा करून त्यासाठी पाच कोटींची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षांमध्ये स्मारकाच्या कामाच्या संदर्भात कुठलीही हालचाल झालेली नाही. प्रशासकीय स्तरावरून निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पतीने दुसरे लग्न केल्यानंतर नाराज न होता ‘त्यांना संसार करण्यासाठी त्यांनी दुसरं लग्न केलं आणि मी देश सेवेचे काम करायला मोकळी झाले’ असे बाणेदार उत्तर आणि ठणकावून सांगत दगडाबाई शेळके यांनी स्वत:ला मुक्तिसंग्रामाच्या लढाईत पूर्णपणे झोकून दिले होते. दगडाबाई या पिस्तुलासह अनेक शस्त्रे चालवायच्या, हातबाॅम्ब फेकायच्या, रेल्वे रुळ उखडायच्या, पोलीस चौकी जाळण्यापर्यंतचे धाडसी कामे करून त्यांनी मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात शौर्य दाखवले होते.
भोकरदन तालुक्यातील कोलते टाकळी येथे जन्मलेल्या दगडाबाईंचा विवाह धोपटेश्वर येथील देवराव शेळकेंसोबत वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षाच झाला होता. हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलिन झाल्यानंतर दगडाबाईंनी पुढे राजकीय मैदानही गाजवले होते. पंचायत समिती सदस्या, जिल्हा परिषद सदस्या म्हणूनही त्यांनी सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता. २०१३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिंची प्रेरणा घेण्यासाठी दगडाबाईंचे स्मारक करण्याची केलेली घोषणा पोकळच ठरली.
धोपटेश्वर येथे आई दगडाबाई शेळके यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. परंतु अद्याप त्यावर काही कार्यवाही झाल्याचे ऐकण्यात आले नाही. स्मारकाबाबत बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्याशी भेट झाली तर चर्चा होते. स्मारक उभं करायचं आहे, एवढे ते आठवणीने सांगतात. – मनोहर शेळके, दगडाबाईंचे चिरंजीव.