छत्रपती संभाजीनगर : ‘अनेक योजनांमध्ये सरकारचे पैसे खर्च होत आहेत. मात्र आम्ही जे वचन दिले, ते वचन पूर्ण करणार,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मार्च महिन्यास दोन दिवस शिल्लक असताना कर्जमाफी मिळणार नाही, येत्या दोन दिवसांत कर्जाची रक्कम भरा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यापूर्वी म्हणाले होते. त्यामुळे कर्जमाफीवरून सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्येच विरोधाभास असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात व राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने याबाबत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याबाबत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. पंचनामे लवकरात लवकर होतील. शेवटी शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही लोक आहोत, असे शिंदे यांनी या वेळी नमूद केले.
‘योजनांमध्ये सरकारचे पैसे खर्च होत आहेत. पण आम्ही वचन दिले आहे, ते वचन पूर्ण करणार’, असेही त्यांनी स्पष्ट केले.