छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असे नुकसान जेव्हा झाले होते त्यावेळेस त्यांनी किती पैसे दिले, हे बघितले तर त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न निर्माण होईल. ते मोर्चा काढतात कारण त्यांना पक्षाला जिवंत ठेवायचे आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ठाकरे गटावर घणाघात केला.

फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी स्वतःला आरशात पहावे. त्यानंतर ते मोर्चे काढणार नाही. उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यात २० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होती. त्याच्या तीन वर्षे आधी आम्हीही २० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती, त्यांनी काही फार मोठे केले, असे नाही. उद्धव ठाकरेंनी ५० हजार रुपये चालू खात्याच्या लोकांना देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यांनी फुटकी कवडी दिली नाही. १६ लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचे सरकार आल्यावर दिले. आताही ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. ज्यातील २१ हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. त्यांनी कर्जमाफी केली होती त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देत आहोत. याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये राज्याचे आणि सहा हजार रुपये केंद्राचे असे १२ हजार आम्ही देतो आहोत, विम्याचे पैसे देतो आहोत.’

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने विभागीय आढावा बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका या संदर्भात काय तयारी झाली, संघटनात्मक रचना कशी करायची व युतीच्या संदर्भातले विषय या बैठकीत चर्चेत असतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.