छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम करणाऱ्या ज्या कंत्राटदाराची तक्रार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली होती, त्या कंत्राटदारांना पुन्हा कामे दिली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या २७०० कोटी रुपयांच्या तरतुदीची वाट लावली आहे, अशा शब्दांत खासदार संदीपान भुमरे यांनी भाजप नेत्यांसमोर प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. कराड यांनाही बचावात्मक पवित्रा घ्यावा लागल्याचे चित्र जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण समितीमध्ये दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ एवढेच नाही तर घरकुल घोटाळ्यातील प्रशासकीय पातळीवरील बेबनावही या बैठकीत चर्चेत आले.

छत्रपती संभाजीनगर ते पैठण दरम्यान ४५ किलोमीटरचे २८९ कोटी रुपयांच्या कामात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून २.५ मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. याकामामुळे खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याचे काम खोळंबले आहे. जलवाहिनी संरक्षित करण्याऐवजी भूमी संपादन करण्यावर तसेच ‘एअर व्हॉल्व’ साठीची रचना स्वीकारण्यावर आग्रह धरला जात आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामुळे चौपदीकरणाच्या कामातील १२ किलोमीटरचे काम कमी करण्यात आल्याच्या नोंदी ‘दिशा’ समितीसमोर ठेवण्यात आल्या. पाणी पुरवठ्याचे हे काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदार अनुभवी नव्हता. मुख्यमंत्र्यांनी ज्या २६ एमएलडी पुरवठ्यास सुरुवात केली त्याचा उपयोग होतो आहे का, असा सवाल भुमरे यांनी केला. या प्रश्नावर डिसेंबरअखेर जलवाहिनीतून पाणी वहन चाचणी केली जाणार असून जानेवारी २०२६ मध्ये हा पाणीपुरवठा सुरू होईल, असे मंत्री अतुल सावे यांनी सांगावे लागले.

शहरात बांधण्यात येणाऱ्या ११ हजार घरकुलासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘वादग्रस्त’ जमीन देण्यात आली. त्यामुळे या योजनेला उशीर लागल्याचा ठपका महापालिका आयुक्तांनी ठेवला तर जी जागा मागितली ती दिली, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनातील बेबनावही बैठकीत दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत प्रधानमंत्री सडक योजनेत ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांना वगळण्यात येत असल्याचे अधिकारी सर्रास सांगत असल्याची तक्रार आमदार संजना जाधव यांनी केली. हा निकष शिथिल करण्याचा प्रस्ताव का पाठवला नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये भाजप नेत्यांचा वरचष्मा असण्याऐवजी शिवसेनेचे आमदार आणि खासदार आक्रमक आणि भाजप बचावात्मक असे चित्र दिसून आले. भुमरे यांनी घेतलेल्या या बैठकीत नुसतीच इतिवृत्तावर चर्चा झाली आणि योजनांच्या अंमलबजावणीचे अनेक विषय चर्चेत आले नाहीत.

भुमरेंनी योजनांची दशा दाखवून दिली ‘दिशा समितीच्या बैठकीत खासदार संदीपान भुमरे यांनी घरकुल योजनेचे वाभाडे काढले. पाणीपुरवठा योजनेवरूनही नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर व पैठण रस्त्यांवरून ते आक्रमक होते. त्यांनी योजनांची दशा कशी झाली आहे, हे दाखवून दिले.- कल्याण काळे, खासदार जालना व दिशा समितीचे सदस्य