छत्रपती संभाजीनगर : शहरातील तरुणाई नशेच्या विळख्यात सापडत असून, त्यांच्यापर्यंत अमलीपदार्थांचा पुरवठा करणारी एक साखळी कार्यरत असल्याची पुष्टी पोलिसांकडून मिळाली. शहरामध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईचा आलेख चढत्या क्रमाने आहे. २०२२ या वर्षामध्ये ५८ कारवाया करण्यात आल्या होत्या, तर चालू वर्षातील दहा महिन्यांतच आतापर्यंत २६० कारवाया करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमधून अमली पदार्थ आणून धुळ्यातील एका टोळी तरुणवर्गापर्यंत नशेची औषधे विक्री करत असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनीच एका कारवाईची माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत मागील चार वर्षांतील आकडेवारी आणि अटक केलेल्या आरोपींच्या संख्येची माहिती मांडली. २०२२ मध्ये ५८ कारवायांमधून १२५ आरोपींना अटक केली. २०२३ मध्ये ८६ कारवायांमधून १२५ आरोपींना, २०२४ मध्ये १४६ कारवायांमध्ये ३३६ आरोपींना तर २०२५ या चालू वर्षात २६० कारवायांमधून ४०० आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हे दाखल करून अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील विविध ठाण्यांतर्गत अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाकडून २०२५ या चालू वर्षातील ९ ऑक्टोबरपर्यंत २ कोटी ३७ लाख ५३ हजार ८४६ रुपये किमतीचा गांजा, चरससह नशेकरिता वापरले जाणाऱ्या गोळ्या व द्रव प्रकारातील (सिरप) औषधे जप्त करण्यात आली आहेत. यासह आतापर्यंत केलेल्या कारवाईत ३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

नुकत्याच केलेल्या कारवाईत अमली पदार्थांचा साठा पुरवणाऱ्या बाहेरील राज्यातील टोळी उघडकीस आणून त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोडीन सिरपच्या १८ हजार ३६० बाटल्या, एक मोटारकार, मोबाईल फोन, असा एकूण ७७ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इंदोरमधील ग्लोबल एन्टरप्रायजेस, राधेय एन्टरप्रायजेस, गुजरातेतील धर्मेंद्र उर्फ गोपाल प्रजापती, इंदोर येथील दुर्गेश सीताराम रावत यांच्याकडून आरोपी ठोक दरात माल विकत घेत असल्याची माहिती पुढे आली व आरोपींकडे औषधे विक्रीचा व साठा करण्याचा कुठलाही परवाना आढळून आला नाही, असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पाेलीस आयुक्त संपत शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार आदी उपस्थित होते.

दोघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

९ ऑक्टोबरच्या कारवाईतील आरोपी कल्पेश चंदूलाल अग्रवाल हा एका शाळेवर शिपाई असून, ज्ञानेश्वर यादव या फरारी आरोपीवर १५ गुन्हे दाखल आहेत. तर सय्यद नबी सय्यद लाल हा वाळूजमधील जोगेश्वरी परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यामार्फतच तरुणांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करणारे जाळे विणले जात असल्याची माहिती होती. कल्पेश अग्रवाल, सय्यद नवी सय्यद लाल यांना अटक करण्यात आली आहे. तर दुर्गेश रावत, धर्मेंद्र उर्फ गोपाल खेमचंद प्रजापती यांनाही अटक करण्यात आली असून, या दोघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहितीही पोलीस आयुक्त पवार यांनी दिली.