छत्रपती संभाजीनगर : मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यानंतर फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी घेतलेल्या ‘ऐतिहासिक’ निर्णयाची माहिती सांगणारे भव्य फलक शहरातील प्रमुख भागांमध्ये उभारण्यात आले आहेत.
जालना मार्गावरील दूध डेअरी चौकात, क्रांती चौक, रोपळेकर चौक परिसरासह शहराच्या ठरावीक मध्यवर्ती भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तुकोबांची पगडी व बुक्क्याच्या टिळ्यासह वारकरी वेषातील व अन्य प्रकारच्या छायाचित्रांसह फलक झळकत आहेत. त्यावर ‘मराठा समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐतिहासिक निर्णय व कार्य’असे शीर्षक दिल्याचे दिसते. फलकावर छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात सारथीची नाममुद्रा केंद्रस्थानी असून संस्थेच्या आठ विभागीय कार्यालयांची माहिती व देण्यात आलेल्या निधीची संख्या दर्शवण्यात आली आहे. विभागीय कार्यालये (छत्रपती शिवाजी महाराज संकुल) – एकूण ८ विभागात शासनाकडून विनामूल्य जमिनी दिल्याचे नमूद केलेले आहे. प्रत्येक विभागासाठी किती कोटी रक्कम दिल्याचेही फलकावर ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.
या माहितीनुसार सारथी पुणे कार्यालयासाठी ४०० कोटींवर, खारघर कार्यालयासाठी ११९ कोटींवर, कोल्हापूर उपकेंद्रासाठी १७६ कोटी, नागपूरसाठी २०४.६४ कोटी, नाशिकसाठी १५८.९९ कोटी, छत्रपती संभाजीनगर कार्यालयासाठी १४०.२४ कोटी तर लातूरसाठी १७२.८६ कोटी रुपये रक्कम दिल्याचा दावा फलक सांगतो आहे. याशिवाय प्रत्येक विभागासाठी ३०० विद्यार्थ्यांची अभ्यासिका, ५०० मुले व ५०० मुलींचे वसतिगृह असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
माहिती कार्यालयाकडूनही सारथीच्या माध्यमातून लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांविषयीची माहिती देण्यात आली आहे. २०२१-२०२२ ते २०२४-२५ या चार वर्षांमध्ये ८ लाख ४७७ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सारथीच्या स्थापनेपासून २०२० ते २०२४ या कालावधीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये ११२ विद्यार्थ्यांची निवड झाली असून ते शासनाच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत. राज्य लोकसेवा आयोगामध्ये २०२० ते २०२३ या कालावधीत १ हजार ४८ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून, वर्ग एकमध्ये २२९ तर वर्ग दोनमध्ये ८१९ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहितीही देण्यात आली. वेगवेगळ्या भागातील फलकावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी घेतलेल्या अन्य निर्णयाची माहिती देण्यात आली.