छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता एकीकडे ढासळली जात असल्याचा असरचा अहवाल आणि त्यावरून नाराजीचे सूर आळवून शिक्षण विभागांकडून राज्यभर परिषदा घेतल्या जातात, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे उपशिक्षणाधिकारी व तत्सम गट-ब, महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा), गटशिक्षणाधिकाऱ्यांसह समकक्ष रिक्त पदे भरली जात नसल्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. महाराष्ट्रात वरील तब्बल ४९६ पदे रिक्त असून, त्यामध्ये ३०० पदे ही गटशिक्षणाधिकाऱ्यांची आहेत. राज्यातील ७० टक्के गटशिक्षणाधिकारी पदांचा कारभार वर्षानुवर्षे प्रभारींवरच सुरू आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने मागील महिन्यात महसुली विभागनिहाय रिक्तपदांची सूची तयार केली आहे. त्यामधून ही माहिती पुढे आली आहे. प्रभारीपदांचा कारभार हाती देताना काही व्यवहार होत असल्याचाही एक आरोप होत आहे. अनेक ठिकाणी दहा-दहा वर्षांपासून प्रभारीच कारभार पाहत असून, प्रभारी डोईजड होऊ लागला की त्याला बदलले जाते. परिणामी तालुकास्तरावरील यंत्रणेवर संनियंत्रण करणारा सक्षम अधिकारी नसून, त्याचा परिणाम गुणवत्ता ढासळण्यावर होत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. सरळसेवेतून शिक्षणाधिकाऱ्यांची पदभरती झाल्यामुळे तरी शिक्षणाची थोडी बरी स्थिती असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात लातूर जिल्ह्यात कमी पदे रिक्त असून, शिक्षणातील लातूर प्रारूप सर्वश्रुत आहे.
महसुली विभागनिहाय रिक्त पदे
विभाग | मंजूर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
नागपूर | १०९ | २० | ८९ |
अमरावती | ९९ | ३० | ६९ |
औरंगाबाद | १४१ | ४७ | ९४ |
कोकण – १ | ४७ | ०८ | ३९ |
नाशिक | ३७ | ६१ | |
कोकण -२ | ७३ | १८ | ५५ |
पुणे | १५२ | ६३ | ८९ |
एकूण | ७१९ | २२३ | ४९६ |
या संदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर व शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी चार दिवसांत अनेक वेळा संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही.