छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोरे प्रकल्पातील २.२४ अब्ज घनफूट पाणी ऑगस्टमध्ये घाटणे उच्च पातळी बंधार्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पात एकूण सात अब्ज घनफूटपाणी मंजूर आहे. भूम परंडा या भागासाठी मंजूर ३.१ अब्ज घनफूट पाण्याची कामे पूर्ण होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. मात्र, पहिल्या टप्प्यात पाणी येण्याची प्रक्रिया आता लवकर पूर्ण होईल असे, कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील भोयरे  येथील पंपगृहाचे  काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी मित्र संस्थेचे उपाध्यक्ष व तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी नुकतीच  केली.  डिसेंबर २०२५ अखेर तुळजापूरच्या रामदरा तलावात येईल. त्यामुळे सिंचनाच्या सोयी वाढतील असा दावा  राणाजगजीत सिंह पाटील यांनी केला.

‘ मधल्या कालावधीत पावसाच्या पाण्यामुळे व अन्य नैसर्गिक व तांत्रिक अडचणींमुळे या कामाला विलंब लागला. त्यानंतर मात्र कामाला वेग घेतल्याचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी सांगितले. आता   पुढील तीन महिन्यात पंपगृहात पंप बसवण्याचे काम चालू होईल. त्यानंतर पुढील कामे आणि चाचण्या होतील. डिसेंबर अखेरपर्यंत उजनीचे पाणी रामदरा तलावात पडेल. दरम्यान रामदरा तलावातील पाणी तुळजापूर तालुक्यासह लोहारा व उमरगा येथे नेण्यासाठी सर्व्हे करुन राज्य सरकारच्या मंजुरीनंतर निविदा काढण्यात येणार आहेत. रामदारा तलावात पाणी आल्यानंतर तुळजापूर मंदिराच्या विकासा आराखड्यातून या तलावात बोटिंग ची सोय केली जाणार आहे. याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे पाणी सिंचनासाठी उपयोगी पडणार असून त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील अर्थकारणाला नवी चालना मिळेल असा दावा केला जात आहे.