छत्रपती संभाजीनगर : समाज कल्याणमंत्री संजय शिरसाट यांच्या गैरव्यवहाराची माहिती पुराव्यासह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांनी वेळ द्यावा, अशी विनंती करणारे पत्र माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पाठविले आहे. दरम्यान शिरसाट यांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे जलील यांनी गुरुवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भेटून दिली. या सर्व आरोपांबाबत संजय शिरसाट यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास गुरुवारी नकार दिला.
दरम्यान जलील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे संजय शिरसाट यांच्या गैरव्यवहाराविषयीची कागदपत्रे पुरविणारे कोण, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शहरातील ‘हॉटेल व्हिटस्’ चे ११० कोटीचे मूल्यांकन असताना तो व्यवहार ६७ कोटी रुपयांमध्ये करण्याच्या हालचाली सुरू असताना विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या प्रकरणात बरीच बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी आपल्या मुलास या व्यवहारातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.
या आरोपानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील भूखंडाचे आरक्षण उठवण्यासाठी मंत्री शिरसाट यांच्यासाठी अधिकाऱ्यांनी कसरती केल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळातील अधिकाऱ्यांनाही त्यांनी याबाबत विचारणा केली. त्यानंतर सहजापूर येथे वर्ग दोन श्रेणीतील जमीन खरेदीमध्ये सिद्धांत शिरसाट यांची मालकी असल्याची कागदपत्रे त्यांनी माध्यमांपर्यंत पोहोचवली. आता या कागदपत्रांसह अन्य प्रकरणाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री व राज्यपालांनी वेळ द्यावा, अशी विनंती जलील यांनी केली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन शिरसाट गैरव्यवहाराबाबत चर्चा केली.
‘माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माझ्याकडे संजय शिरसाट यांच्याशी संबंधित कागदपत्रे दिली. त्यांनी दिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून त्याची तक्रार करायची का, किंवा त्या कागदपत्राच्या आधारे गैरव्यवहारावर कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा करेन.’ अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद
‘हा मुद्दा विधानसभेत चर्चेला यावा अशी इच्छा आहे. आता मी लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे या प्रश्नावर विधिमंडळात दानवे यांनी चर्चा घडवून आणावी, अशी विनंती करण्यासाठी गेलो होतो.’ इम्तियाज जलील, माजी खासदार
इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबेडकरी नेते आक्रमक
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील हे जातीयवादी असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. बुधवारच्या पत्रकार बैठकीतही त्यांनी दलित आंबेडकरी जनतेविरोधात ‘हरिजन’ या सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या शब्दाचा वापर केला आहे. त्यांच्याविरोधात येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात जातिवाचक शब्द वापरल्याप्रकरणी अनुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची तक्रार देण्यात आली आहे. यावेळी सर्वपक्षातील आंबेडकरी विचारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यासंदर्भात आलेली तक्रार स्वीकारली आहे. अद्याप गुन्हा दाखल नाही. तक्रार वरिष्ठांकडे अवलोकनार्थ पाठवून पुढील प्रक्रिया ठरेल, असे क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. यावेळी ठाण्याच्या परिसरात दंगा काबू पथक तैनात होते. इम्तियाज जलील यांच्या विरोधात यापुढे राज्यभरात तक्रारी दाखल करण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले.