छत्रपती संभाजीनगर : विरोधकांनी मतचोरी होत असल्यासारखे निरर्थक मुद्दे रेटून अपप्रचार केला. परंतु, बिहारच्या निवडणुकीतून विरोधकांच्या अपप्रचाराला मतदारांनीच चपराक दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांची माती होईल, हे आपले भाकित खरे ठरल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे बिहारच्या यशाच्या हेच प्रारूप घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेत जावे, असा संदेश दिला. मित्रपक्षांसोबत एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी त्यांच्याशी कट्टर विरोधकांसारखे न लढता मित्रपक्ष असल्याचे भान ठेवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
येथील चिकलठाणा विमानतळासमोरील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते रविवारी येथे बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार डाॅ. भागवत कराड, डाॅ. अजित गोपछडे, रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, प्रशांत बंब, सुरेश धस, संजय केणेकर आदी आमदारांसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्या महायुतीच्या सरकारकाळात छत्रपती संभाजीनगरसाठी १ हजार ६८० कोटींची पाणी योजना आणि महानगरपालिकेवर पडणारा ८०० कोटींचा भार लक्षात घेऊन तोही मंजूर केल्याचे सांगितले. महाआघाडी सरकार आले तेव्हा हाच ८०० कोटींचा भार महानगरपालिकेने भरावा, असा निर्णय घेतल्याचे सांगत फडणवीस यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.
येथील औद्योगिक क्षेत्र मॅग्नेट झाल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर हे विजेवरील वाहन निर्मितीची राजधानी होत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ हे ७४० कोटी देऊन आंतरराष्ट्रीय स्तराचे तयार करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्रात १ लाख १२ हजार कोटींचे उद्योग देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप कार्यालयासाठी कुठेही सरकारी जमीन घ्यायची नाही, अवैध बांधकाम करायचे नाही, हे धाेरण ठरवूनच कार्यालयांची उभारणी केली, असा दावाही फडणवीस यांनी केला.
जनसंघानंतर टपरीवजा जागेत कार्यालय
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी १९७७ सालानंतर जनसंघ भाजपमध्ये विलीन झाल्याची आठवण जागवताना जालन्यामध्ये बसस्थानकाशेजारी एका टपरीवजा जागेत पक्षाचे कार्यालय थाटल्याचे सांगितले. जालन्यातील कार्यालय समाजवाद्यांनी हिसकावल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
भाजप महापाैर करायचा
सर्वच ठिकाणी भाजपचाच महापौर करायचा, अशी मांडणी प्रमुख नेत्यांनी केली. त्यामध्ये मंत्री अतुल सावे, डाॅ. भागवत कराड, जिल्हा शहराध्यक्ष किशोर शितोळे आदींचा समावेश होता. पंकजा मुंडे यांनी संघर्षकन्या यांनीही अटल बिहारी यांची संघर्षावरील कविता सादर करून भाषण केले.
पक्षांतर्गत विरोधक नेते एकाच व्यासपीठावर
जालन्यातील रावसाहेब दानवे व आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तर बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस व मंत्री पंकजा मुंडे यांचेही आरोप-प्रत्यारोप चांगलेच चर्चेत राहिलेले आहेत. येथील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, सुरेश धस हे एकत्र पाहायला मिळाले.
