छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा-बिडकीन या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडणारा वळण रस्ता, इलेक्ट्रिकल्स वाहनाला आवश्यक असणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्रासाठी (ईव्ही ऑटो क्लस्टर) पाच एकराची जागा, छत्रपती संभाजीनगर शहरातून स्वतंत्र पूल आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सभागृहासाठी व्यवहार्यता अंतर निधीची तरतूद अशा उद्योजकांनी केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मान्य केल्या.

शेंद्रा-बिडकीनसह औद्योगिक वसाहतींना जोडणारा वळण रस्ता झाला आहे, असा आपला समज होता. मात्र, हा रस्ता पूर्ण झाला नसेल तर तो पूर्ण केला जाईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांनी मांडलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदर्शन सभागृहांची मागणी ‘सीएमआयए’ चे अध्यक्ष अर्पित सावे यांनी मांडली होती. असे प्रदर्शन व परिषद सभागृह करायलाच हवे. पण असे सभागृह चालविणाऱ्या अनुभवी संस्थांशी संपर्क साधून त्याची व्यवहार्यता तपासावी लागणार आहे. जर असे प्रदर्शन किंवा परिषद सभागृह उभे केले तर त्याला लागणारा खर्च, संस्थेच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न आणि उरलेला निधी यातील व्यवहार्यता निधी (व्हायबलेटी गॅप फंडिंग ) करण्यास राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईव्ही ऑटो क्लस्टर

इलेक्ट्रिकल्स वाहन निर्मिती क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर हे देशातील महत्त्वाचे ठिकाण असणार आहे. टोएटोच्या गुंतवणुकीच्या वेळी कर्नाटक सरकारने त्यांना बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केले होते. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील औद्योगिक वातावरण आणि पायाभूत सुविधांमुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रात आली. आता अशा गुंतवणुकीमुळे राज्यात औद्योगिक वाढीचे चुंबक म्हणून या शहराकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच येथे आणखी आठ हजार एकर जमीन संपादन केली जाणार आहे. या पुढे ‘ईव्ही’ वाहन निर्मितीसाठी सामूहिक सुविधा केंद्र ऑटो क्लस्टर तयार करणे आवश्यक आहे. यासाठी तातडीने पाच एकर जागा देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने दिले जातील, असेही फडणवीस म्हणाले.