|| बिपिन देशपांडे

चारा-पाण्यावर प्रतिदिन २० हजार रुपये खर्च

औरंगाबाद : राज्यसरकारतर्फे ‘गोवर्धन गोवंश योजनें’तर्गत गोपालनासाठी देण्यात येणारे अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे मराठवाडय़ात सुमारे सव्वाशे गोशाळा संकटात सापडल्या आहेत.

गोवंश कायदा लागू झाल्यानंतर गायींविषयीचे प्रेम अधिक प्रकर्षांने पुढे येऊ लागले. गायींची कत्तलीसाठी नेण्यात येणारी वाहने पकडून देण्याच्या संख्येत वाढ झाली. मात्र, ही वाहने पकडून देणारे नामानिराळे होऊ लागल्याने गायींची रवानगी गोशाळांमध्ये करण्याची वेळ आली. अशा वेळी या गायींच्या दैनंदिन चाऱ्याचे काय, असा प्रश्न निर्माण होऊ लागला.  देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरुवातीला गोशाळांना ‘गोवर्धन गोवंश योजनें’तर्गत एक कोटींचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबादमधील शारदामाता संस्थेची गोशाळा, बीडमधील पालवण येथील यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व परळी वैजनाथ येथील रामरक्षा प्रतिष्ठान गोशाळा, जालन्यातील गोरक्षण पांजरपोळ, परभणी जिल्ह्य़ातील राणी सावरगाव येथील छत्रपती शिवाजी गोशाळा अनुदानासाठी पात्र ठरल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अरविंद चव्हाण यांनी दिली.

अनुदानास पात्र ठरलेल्या गोशाळांना ५० ते ७५ टक्क्य़ांपर्यंत रक्कम मिळाली आहे. मात्र उर्वरित अनुदान रखडले. त्यानंतर एक कोटींचे अनुदान २५ लाखांवर आणण्यात आले. मात्र, ते अनुदानही आचारसंहितेच्या कात्रीत सापडले. गेल्या सहा महिन्यांपासून कुठलेही अनुदान हे पात्र गोशाळांनाही मिळालेले नाही. आता नवीन सरकार आले आहे. त्यांचे गोशाळांच्या अनुदानाबाबतचे धोरण स्पष्ट झालेले नाही.

अनुदानास पात्र न ठरलेल्या गोशाळा चालवायच्या कशा, असाही एक प्रश्न आहे. अशा गोशाळांचा खर्चही सध्या शेतकरी, दात्यांकडून मिळणाऱ्या मदतीवरच सुरू आहे. मराठवाडय़ात शंभरपेक्षा अधिक गोशाळा असून त्यात लहान-मोठे मिळून पंधरा हजारपेक्षाही अधिक गोधन आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने असलेली जित्राब (गोधन) जगवण्यासाठी गोशाळा चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

खर्च किती?

मानवत तालुक्यातील रामे टाकळी येथील माणिक रासवे या शिक्षकाने गो-शाळा चालवण्यातही पुढाकार घेतला. त्यांच्या गोशाळेत ३०० गायी आहेत. एका गायीला दिवसभरात साधारण २० किलो चारा लागतो. ३ किलो चाऱ्याची एक पेंडी २५ रुपयांना मिळते. पाणी, कर्मचारी असा सर्व खर्च पाहता गो-शाळांना प्रतिदिन साधारण २० हजार रुपयांपेक्षा अधिकचा खर्च येतो, असे रासवे यांनी सांगितले.

खाद्य तयार करण्यातही अडथळे..

औरंगाबादजवळील शिल्लेगाव येथील नरेंद्र नरोडे हे गोमुत्रापासून औषध तयार करतात. गोधन जगवण्यात येणाऱ्या अडचणींबाबत ते म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून गोधन जगवण्यासाठीच्या अडचणींवर मार्ग काढावा लागतो. आम्ही मुरघासचा प्रयोग करतो आहोत. यामध्ये दीड वर्षांपर्यंत गोधनासाठी लागणारे खाद्य टिकते. यासाठी हिरव्या मक्याची पूड करून ती गुळ, मीठ व कल्चर (विरजन) पुडीच्या आधारे लोणच्यासारखी मुरवली जाते. यंदा अतिवृष्टी व अळीमुळे मक्याचे नुकसान झाले आहे. मका मिळणेही अवघड झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोशाळा चालवणाऱ्यांपैकी अनेकजण सन्यस्त जीवन जगणारे आणि निस्पृह व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा स्वभाव अनुदानासाठी सरकारी दप्तरात हेलपाटे मारण्याचा नसतो. दानशुरांची मदत घेऊनच ते गोधन जगवण्यासाठी प्रयत्न करतात. अशावेळी गोशाळांना राजाश्रय मिळायला हवा. गव्हाच्या तणाचा भुसा जनावरे आवडीने खातात. भुसा तयार करणारे यंत्र तीन-साडे तीन लाखांत मिळते. हे यंत्र देण्यातही सरकारला अडचण नाही.  – नरेंद्र नरोडे, शिल्लेगाव.