छत्रपती संभाजीनगर : यंदा अतिवृष्टीने अवघी भारतभू व्यापली असून, त्याचा फटका एका प्रदेशातून दुसरीकडे आयात-निर्यात करणाऱ्या मालाच्या व्यावसायिकांना बसला आहे. आसाममधील गुवाहटी व परिसरातीतील बांबू आयातीवरही परिणाम दिसून येत असून, बांबूची तोड आणि शेतशिवारापर्यंत मालवाहू वाहने पोहोचवणे कसरतीचे झाल्याने नवरात्रोत्सवात देवीचा जोगवा मागण्यासाठी किंवा घटस्थापनेवेळी अनन्य महत्त्व असलेल्या परड्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. दरही चांगलेच कडाडले आहेत.
आयात करण्यासह बांबू चिरून कामट्यांनी परडी, दुरडी, झाल (मोठी परडी) गुंफणाऱ्या हस्तकारागिरांचीही चणचण असून, हे कौशल्य जुन्या काळातील महिला, पुरुषांकडेच पाहायला मिळते. नवी पिढी शिक्षणात असल्याने आणि पारंपरिक कौशल्य शिकण्याकडे त्यांचा फारसा कल नसल्याने जुन्या कारागिरांवरच परडी, झाल विणण्याची भिस्त राहिली. लहान आकारातली एक परडी गुंफायला किमान एक तास लागतो. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या ‘झाल’साठी अधिकचा वेळ लागतो. परिणामी त्याची निर्मिती शेकड्यांच्या संख्येतच घडते. तेही अनेक दिवस काम केले तरच. देवीच्या घटस्थापनेला प्लास्टिक आदी प्रकारातील परड्यांऐवजी हस्ताकारागिरांकडून केलेल्या परडीलाच अधिक प्राधान्य दिले जात असल्याने त्या तुलनेत पुरवठा करणे शक्य होत नाही, असे येथील बांबूचे व्यापारी शीतल प्रकाशचंद कपूर यांनी सांगितले.
बांबूमध्ये पोकळ आणि भरीव असे दोन प्रकार आढळून येतात. हिरवे आणि पिवळसर असे दोन रंग. बहुतांश भरीव बांबूची आयात आसामातील गुवाहटीतून केली जाते. तर काही बांबू हा कोकणातून मागवला जातो. यंदा देशभरात अतिवृष्टी झाल्याने त्याचा फटका बांबूच्या शेतीपर्यंत पोहचून खरेदी करणाऱ्यांना बसला आहे, असेही शीतल कपूर यांनी सांगितले.
गुवाहटीसारख्या दूर प्रदेशातून माल आणण्यासाठी यंदा ८० हजार रुपये एकवेळचे भाडे आकारले जात आहे. एका खेपेत साधारण १० टन बांबूचा माल आणला जातो. बांबूच्या शेती आडमार्गात असून, तेथपर्यंत वाहन घेऊन पोहोचणे ही कसरत होती. – रामेश्वर दहिवाळ, ट्रकचालक.
यंदा लहान आकारातील परड्यांचा ठोक दर ४० रुपये नग आहे. परड्या तयार करणारे हस्तकारागिरच मिळणे अवघड झाले आहे. काही परड्या, झाल येथील कारागिरांकडून तयार करून घेतल्या तर काही गुजरात, चंद्रपूर आदी ठिकाणांहून मागवाव्या लागल्या. – शीतल कपूर, बांबू वस्तुचे व्यापारी.