छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात बुधवारी रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना आणि लातूर या चार जिल्ह्यांतील २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदिवण्यात आली. अनेक भागांतील शेतातून पाणी वाहिले. उन्हाळी बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा, वाळुज, तसेच ग्रामीण भागातील सिल्लोड, निल्लोड पीरबावडा, वडोदबाजार, बाबरा या महसूल मंडळात किमान ६७ आणि कमाल ८९ मिमी पावसाची नोंद झाली.

मे महिन्यात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी रात्री मुळसधार पावसाला सुरुवात झाली. काही भागांत पावसासह वाऱ्याचा जोरही अधिक होता. सिमेंटचे रस्ते वर आणि इमारती खाली असल्याने काही भागात पाणीही शिरू लागले होते. सलग पावसामुळे मे महिन्यात पावसाळा सुरू झाल्यासारखे वातावरण आहे. जालना, संभाजीनगर, लातूर आणि धाराशिवमध्ये जोरदार पाऊस झाल्याने फळपिकांचे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

लातूरमध्ये सलग बाराव्या दिवशी जोरदार पाऊस

लातूर शहर आणि परिसरात गुरुवारी सलग बाराव्या दिवशी जोरदार पाऊस पडला. वळवाचा पाऊस हा एखाद-दुसऱ्या दिवशी पडून गायब होतो. या वर्षी मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतच मे महिन्यात पावसाळ्यासारखे वातावरण तयार झाले आहे. महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाई केलेली नसल्यामुळे शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे नांगरणीसारखी मशागतीची कामे रखडली आहेत. कधी नव्हे ते उन्हाळ्यात नद्यांना पाणी आले असून, रेणा नदीवरच्या छोट्या क्षमतेच्या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून नदीत पाणी सोडण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली. एरवी जून, जुलै उजाडला, तरी पावसाचा टिपूसही पडत नसल्यामुळे आभाळाकडे पाहण्याची सवय लागलेल्या लातूर जिल्ह्यात या वर्षी मे महिन्याच्या मध्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. धाराशिव, जालन्यातही असेच चित्र दिसून येत आहे.