छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री ते रविवारच्या दिवसभरात झालेल्या पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेल्याने खरीप हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जायकवाडीचे सर्वच्या सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले होते. तर मांजरा धरणाचे १, ३, ४ व ६ हे चार वक्री दरवाजे ०.२५ मीटरने उघडून नदीपात्रात ३ हजार ४९४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता.
बीडमधील १८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, अनेक गावांना पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली होती, तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता. राक्षसभुवनचे शनिमंदिर पाण्याखाली होते, तर गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. जायकवाडी धरणातून शनिवारी रात्रीपासूनच नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणीपातळी वाढल्यास गेवराई तालुक्यातील गुंतेगाव, बोरगांव, पाथरवाला, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिपंळगावं, नागझरी, खामगाव, आगरनांदुर, पांढरी, मिरगावं, पागुळगावं, राजापूर, रामपुरी, भोगलगाव आदी गावांना पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात गेवराई आणि शिरूर कासार तालुक्यात सर्वाधिक ९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पिकांचे मूळ सतत पाण्यात राहिल्यामुळे ते कुजले आहेत. पिके पिवळी पडू लागली आहेत. उसावर देखील याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे गोवर्धन हिवरा येथील माजी सरपंच तथा शेतकरी राजेसाहेब निर्मळ यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामध्ये पैठण (२०० मिमी), पिंपळवाडी (१५०), बिडकीन (६३), ढोरकीन (११६), बालानगर (१००), नांदर (२१९), आडूळ (५१), पाचोड (१०२), लोहगाव (१५९) व विहामांडवा (१९७) मंडळांचा समावेश आहे. विहामांडवा येथील अनेक घरांमध्ये पाणी गेले.
धाराशिव जिल्ह्यातही मागील दोन दिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसाने तेर परिसरातील तेरणा धरणाने शनिवारी रात्री रौद्र रूप धारण केले होते. तेर, रामवाडी, कोंबडवाडी, गोवर्धनवाडी येथील शेतशिवार खरडवून माती आणि पिके वाहून गेली आहेत. गावातही पाणी शिरल्याने ग्रामस्थांच्या अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. उपळे दुमाला, कसबे तडवळे, येडशी, येरमाळा, कोंबडवाडी या गावांसह परिसरात शनिवारी सायंकाळी २०० मिलीमीटर पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाणी अनेक घरांमध्ये शिरले. रविवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, तेरचे ग्राममंडळ अधिकारी शरद पवार, ग्राममहसूल अधिकारी प्रशांत देशमुख उपस्थित होते. तेर येथील माउली ट्रेडर्समधील १०० पोते सिमेंट भिजले, असे ज्ञानदेव कुंभार यांनी सांगितले. परंडा तालुक्यात तब्बल १०९.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
हिंगोलीत गेल्या २४ तासांत सरासरी २७.४ मि.मी. पाऊस झाला. त्यात हिंगोली तालुक्यात सर्वाधिक ३८.२ मि.मी. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी १६.२ मि.मी.पावसाची नोंद झाली. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८४५.६ मि.मी. पाऊस झाला असून, ही सरासरी ११८.६ टक्के इतकी आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसान नद्या-नाल्यांना पूर आला असून, खरीप हंगामातील ३.४७ लाख हेक्टर पेरणीवर मोठे संकट आले आहे. जूनमध्ये झालेल्या नुकसानीसाठी मागवलेले ५.७७ कोटींचे साहाय्य शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही. सेनगाव तालुक्यातील पान कनेरगाव येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन व हळद पिकात पाणी साचले आहे.
पुलावरून पाणी; धाराशिव-लातूर राज्यमार्ग बंद
तेरणा धरण परिसरात एकाच रात्रीत झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव ते लातूर हा राज्यमार्ग रूई-ढोकी येथे बंद झाला होता. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रूई-ढोकी येथील पुलावरून जवळपास चार फूट पाणी वाहत असल्यामुळे वाहनधारकांनी धोक्याची शक्यता गृहीत धरून पाण्यातून वाहने घालणे टाळले होते. दरम्यान एक चारचाकी गाडी तेरणा नदीत वाहून जात होती. मात्र तिथे उपस्थित काही तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून गाडी पाण्याबाहेर काढली. सध्या पुलावरून पाणी ओसरल्याने मार्ग चालू झाला आहे.
माजलगाव धरणातून सिंधफणा नदीपात्रात विसर्ग
माजलगाव येथे असलेल्या धरणातून धरणाचे १० वक्र दरवाजे ०.८० मीटरने वर उचलत सिंदफणा नदी पात्रात ३१ हजार ३३५ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. माजलगाव धरणातील सोडण्यात आलेले पाणी आणि गोदावरीतील पूरस्थितीमुळे सिंदफणा नदीची पाणी पातळी वाढल्याने माजलगाव, मंजरथ व ढालेगाव नदीकाठच्या गावामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
परभणीत चार मजूर अडकले
परभणी जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली असल्याने कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे चालू आहेत. परभणीसह पूर्णा, पालम या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. वसमत रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते. पूर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचे काम चालू असून याठिकाणी कामाचे साहित्य, सामग्री, यंत्रे ही सर्व सामग्री थुना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये सापडल्यामुळे या मशिनरीवर काम करणारे चार मजूर अडकलेले होते. त्यांना शनिवारी पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जालन्यातील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी
जालना : अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. या दोन तालुक्यांतील सहा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. वडिगोद्री मंडलात एकाच दिवसात १८५ मि.मी. पाऊस झाला. तर गोंदी मंडलात १०४ मि.मी., सुखापुरी मंडलात ७२ मि.मी., घनसावंगीतील तिर्थपुरी, कुंभार पिंपळगाव आणि अंतरवाली मंडलात प्रत्येकी ११५ मि.मी. पाऊस झाला. निम्न दूधना प्रकल्प ७५ टक्के तर खडकपूर्ण प्रकल्प ९५ टक्के भरला आहे. राजाटाकळी, मंगरूळ, जोगलादेवी, पाथरवाला हे उच्चपातळी बंधारे १०० टक्के भरले आहेत. तर लोणी सावंगी बंधाऱ्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झालेला आहे. जिल्हयातील सात पैकी दोन मध्यम प्रकल्प वाहत आहेत. नालेवाडी येथे तीन कुटुंबातील दहा व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. गोंदीतील जि. प. कन्या प्रशालेच्या प्रांगणातही पाणी साचले आहे. अंबड तालुक्यातील पानेगाव येथे वीज पडल्याने एक म्हैस तर घनसावंगीतील शिंदे वडगाव येथे एक बैल मृत्युमुखी पडला.