राज्यातील १२ पर्यटनस्थळांवर हेलिकॉप्टर सेवा पुरविण्यासाठी रेकी पूर्ण झाली आहे. उत्तर मुंबईमध्ये सुरू झालेली सेवा गेल्या ३७ दिवसांपासून सुरळीत सुरू आहे. येत्या काळात अन्यत्रही हेलिकॉप्टर सेवा देण्याचा विचार सुरू आहे. तसे खासगी कंपनीबरोबर बोलणे झाले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, महाबळेश्वर, गणपतीपुळे, माथेरान, मुरुड येथे हेलिकॉप्टर सेवा दिली जात आहे.
हेलिकॉप्टर सेवा पुरविण्यासाठी नेमलेल्या एजन्सीने ६० टक्के आसन क्षमता भरण्याची अट टाकली आहे. काही आसने रिकामी राहिल्यास ती तिकिटाची रक्कम महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. त्या विषयी चर्चा सुरू आहे. मात्र, राज्यातील १२ ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा देण्याविषयी रेकी पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे संचालक सतीश सोनी यांनी दिली. वाघाच्या शिकारीसाठी आलेल्या जॉन स्मिथ यांना १९१९ मध्ये अजिंठा लेणी दिसली. त्यांच्या पाचव्या पिढीतील कर्नल मार्टनि स्मिथ २६ फेब्रुवारीला अजिंठा लेणीच्या भेटीस येणार आहेत. या भेटीच्या पूर्वतयारीसाठी सोनी शुक्रवारी औरंगाबाद येथे आले होते.
तिरुपतीला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असल्याने राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत तुलनेने घट झाल्याचे मान्य करीत सोनी म्हणाले की, येत्या कालावधीत पर्यटनस्थळी हेलिकॉप्टर सेवा देण्यास प्रयत्न सुरू आहेत. या सेवेतून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने केवळ २.५ टक्के कमिशन घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, रिक्त आसन क्षमतेबाबतची चर्चा पूर्ण होणे अजून बाकी आहे. ताडोबा व माथेरानसारख्या पर्यटनस्थळावरही ही सेवा सुरू करण्यास पर्यावरण विभागाची परवानगी मिळणे बाकी आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
पर्यटनस्थळी २२० सहायक
पर्यटनस्थळी दुभाषकांची संख्या कमी असते. दुभाषकांना कोणत्या विभागाने प्रमाणपत्र द्यावे, यावरून पुरातत्त्व विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळात वाद होते. विशेषत: आखाती देशातून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत माहिती सांगण्याची आवश्यकता असते. विविध पर्यटनस्थळी गाइड निर्माण व्हावेत, म्हणून भोपाळ येथील प्रशिक्षण संस्थेबरोबर करार केला होता. मात्र, या प्रशिक्षित व्यक्तींना गाइड न म्हणता सहायक असे नमूद करण्यात आले आहे. त्याचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. असे २२० सहायक गेल्या सहा महिन्यांत सेवेत रुजू झाले आहेत.
औरंगाबाद व वेरुळ येथे बांधलेल्या व्हिजिटर सेंटरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. तसेच ते चालविण्यासाठी कंत्राटदार एजन्सी नेमण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळास आणखी सहा महिने लागतील, असेही सोनी यांनी सांगितले.