औरंगाबाद : तमाशा कलावंतांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य नेटाने करणाऱ्या बीड जिल्ह्याच्या शिरुर कासार तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथील सेवाश्रम संस्थेला मुलांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या निवासाची सोय करण्यासाठी औरंगाबाद शहरात इमारत उभारायची आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

संस्थेकडे असलेल्या ५५ मुलांपैकी काही मुले उच्च शिक्षणासाठी औरंगाबाद येथील नव्या केंद्रात भाडय़ाच्या इमारतीमध्ये राहत आहेत. ब्रह्मनाथ येळंब येथील मुलांचे संगोपन आणि औरंगाबाद शहरात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या निवासाची गैरसोय दूर झाली तर ही मुले आपले शिक्षण निर्विघ्न पूर्ण करू शकतील. 

तमाशा कलावंतांच्या मुलांना ढोलकी आणि घुंगराच्या जगातून बाहेर काढून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा ध्यास सुरेश राजहंस आणि त्यांच्या पत्नी मयुरी यांनी घेतला आहे. राजहंस दाम्पत्याने २०११ पासून या कार्याला वाहून घेतले आहे. यासंदर्भात सुरेश राजहंस म्हणाले, ‘‘पुरुषांच्या मनोरंजनासाठी बाईचा असा वापर करणे हेच मुळात गैर आहे. पण ‘लोककला’ म्हणून सारे सुरू आहे. त्यात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे वेगवेगळया प्रकारचे शोषण सुरू असते. तमाशात काम करणाऱ्या पुरुषाला अन्य क्षेत्रात काम मिळण्याची शक्यता कमीच. त्यामुळे मिळेल त्या बिदागीत ही कलाकार मंडळी काम करत असतात. परिणामी, त्यांच्या मुलांचे प्रश्न गुंतागुंतीचे होतात.’’

तमाशा कलावंतांच्या मुलांना शिक्षण मिळतच नाही. मुलगी असेल तर ती बोर्डावर नाचते म्हणून तीही या दुष्टचक्रात अडकते,  बाहेर पडू शकत नाही. या मुलांना किमान शाळा तरी मिळावी, असे आमचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नांमध्ये समाजाचेही मोठे योगदान आहेच; त्याशिवाय इथपर्यंतचा प्रवास अशक्यच होता, असेही राजहंस यांनी सांगितले.

किराणा, कपडय़ांपासून ते दुष्काळी गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे पैसे देण्यासाठीसुद्धा पुणे येथील ‘प्राज फाउंडेशन’ राजहंस दाम्पत्याच्या संस्थेला मदत करते. या मुलांना चांगले इंग्रजी बोलता यावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनाची जबाबदारीही एका संस्थेने घेतली आहे.

तमाशा कलावंतांच्या मुलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप गुंतागुतीचे आहे. करोना संकटकाळात त्यांचे प्रश्न अधिकच गंभीर बनले. बाहेरगावी तांत्रिक शिक्षणासाठी गेलेल्या मुलांना घरी परतायचे होते, पण परतणार कुठे, राहाणार कुठे असा प्रश्न होता. कारण जागा नव्हती. त्यामुळे अनेक मुले पुन्हा ‘सेवाश्रमा’त राहायला आली. करोना साथीमुळे त्यांचे शिक्षण थांबले होते. त्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले. औरंगाबाद शहरात १५ मुलांची सोय झाली. त्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च दात्यांच्या मदतीतून केला जातो. पण शहरी भागात त्यांना हक्काचे छप्पर मिळाले तर त्यांच्यापुढे असलेल्या अनेक समस्या सुटतील. त्यांना निवारा मिळावा, म्हणूनच संस्थेला मदत हवी आहे.

मुलांच्या संगोपनासाठी दररोज मदत मिळवणे सुरू असते, पण आता त्यावरही मर्यादा पडू लागल्याने सेवाश्रम संस्थेची अडचण होत आहे. तमाशा कलावंतांच्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मानस असल्याचे मयूरी राजहंस यांनी सांगितले. या समाजातील मुलांचे प्रश्न निराळे आहेत आणि मुलींचे त्याहून वेगळे. मुलींना तमाशापासून दूर करू दिले जात नाही. तसे करण्यास तमाशा कलावंतच विरोध करतात. पण चांगला समाज घडवायचा असेल आणि लोककला म्हणूनही तमाशा टिकवायचा असेल तर शिक्षण हेच त्यावरचे उत्तर आहे. त्यावर काम करावेच लागेल, असा निर्धार मयूरी राजहंस यांनी व्यक्त केला. त्यांच्या निर्धारास आर्थिक साथ मिळाली तर या मुलांची आयुष्ये संस्था उभी करू शकेल.