छत्रपती संभाजीनगर : शहरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सुमारे १ हजार ९०६ विविध धार्मिक स्थळांवरून वापर होत असलेले ६ हजार ५९१ भोंगे जुलै मध्यापासून ते १२ ऑगस्टपर्यंत खाली उतरवण्यात आले आहेत. आता पुन्हा संबंधित धार्मिक स्थळावर भोंगा लावायचा असेल, तर विविध प्रकारची अर्धा डझन कागदपत्रे अर्जाला लावून परवानगी घ्यावी लागेल आणि ती तीनच महिन्यांसाठी दिली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा परवानगीचा फेरा करावा लागणार आहे.

या संदर्भातील माहिती बुधवारी पोलीस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. या वेळी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव उपस्थित होते. न्यायालय, सरकार आणि प्रशासन स्तरावरील यंत्रणेचा आधार घेऊन शहरातील मशीद, मंदिर, विहार, गुरुद्वारा, चर्च, दर्गा अशा धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाशी संवाद साधण्यात आला.

भोंग्यासंदर्भाने न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरचा आदेश आणि भोंगा काढण्याच्या संदर्भाने आखून दिलेली पद्धत याचा विचार करून धार्मिकस्थळाशी संबंधित व्यवस्थापन प्रमुखांशी संपर्क करण्यात आला. प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यांच्या कार्यक्षेत्रातील धार्मिक स्थळांची आणि प्रमुखांची फोन क्रमांकासह माहिती उपलब्ध असल्याने संपर्क साधण्यात अडचणी आल्या नाहीत, असा दावा पोलीस उपायुक्त नवले यांनी केला.

ध्वनिवर्धकातून निघणाऱ्या आवाजाची पातळी ही औद्योगिक क्षेत्रासाठी ७५, व्यापारी क्षेत्रात ६५, निवासी भागासाठी ५५, शांतता भागात ५५ डेसिबल असावी, असा निकष ठरवण्यात आलेला आहे. या निकषांबाबतही जागृती करून धार्मिक स्थळांशी संबंधित व्यवस्थापनाच्या १७ पोलीस ठाण्यांमध्ये ६१ बैठका घेण्यात आल्या. सहायक पोलीस आयुक्त, उपायुक्त स्तरावर १८, तर पोलीस आयुक्तांसमोर चार बैठका घेण्यात आल्या.

मंदिर १ हजार ९३, मशीद ५४५, विहार १४९, गुरुद्वारा ४, चर्च ४१ व दर्गा ७४ अशा विविध धार्मिक स्थळांवरील सहा हजार ५९१ ध्वनिवर्धक (भोंगे) काढण्यात आले. नव्याने भोंगा लावायचा असेल, तर त्यासाठी पुन्हा अर्ज करायचा आहे. त्यासाठी संबंधित स्थळाच्या जमिनीचे, बांधकाम परवानगीचे, कंत्राटदाराचे नाव, संस्थेचा ठराव किंवा सदस्यांची सहमती आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ध्वनिक्षेपकाचा आकार १५ बाय १२ आकाराचा आणि त्याची पातळीची मर्यादा ३.५ वॅट असावी. मिळणारी परवानगी तीन महिन्यांसाठीच असेल, असेही सांगण्यात आले.